मुंबई: सीएसएमटी स्थानकात २४ डब्यांचा रेल्वे गाड्यांसाठी फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरासंदर्भात प्री नॉन- इंटरलॉकिंग काम पूर्ण करण्यासाठी दोन दिवस ब्लॉकची घोषणा केली आहे. यासाठी शुक्रवारी-शनिवारी पाच तासांचा आणि शनिवारी-रविवारी रात्री १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेच्या तब्ब्ल ५९ लोकल रद्द आणि ३ मेल- एक्स्प्रेस गाड्या रद्द असणार आहे.
सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १२ आणि १३ फलाटांची लांबी २४ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी वाढवण्यात येत आहे. फलाट विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आता प्री नॉन-इंटरलॉकिंग काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल १५ तासांचा मेगाब्लॉकची घोषणा केली.
यासाठी दोन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिला पाच तासांचा ब्लॉक शुक्रवार रात्री ११.३० ते शनिवारी पहाटे ४.३० वाजेपर्यत सीएसएमटी ते भायखळा अप आणि डाऊन जलद मार्गावर आहे. तर दुसरा दहा तासांचा ब्लॉक शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी सकाळी ९.१५ वाजेपर्यत असणार आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते भायखळा अप-डाउन जलद आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे. मुख्य मार्गावरील लोकल सेवा भायखळा, , दादर स्थानकांपर्यत चालविण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल वडाळा रोडपर्यत चालविण्यात येणार आहे.
शनिवारी शेवटची लोकलशनिवारी सीएसएमटी स्थानकांवरून शेवटची धीमी लोकल रात्री १०.४६ वाजताची सीएसएमटी-ठाणे धीमी लोकल असणार आहे. तर शेवटची जलद लोकल रात्री १०.४१ वाजताची सीएसएमटी- बलापूर लोकल असणार आहे. तर हार्बर मार्गवरील शेवटची लोकल रात्री १०.३४ वाजताची सीएसएमटी-पनवेल लोकल तर, रात्री ११.२४ सीएसएमटी- गोरेगाव लोकल धावणार आहे.
मेल-एक्स्प्रेस रद्दब्लॉकमुळे शनिवारी-रविवारी ट्रेन क्रमांक ११००८/०७ पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१२८/२७ पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक १७६१८/१७ नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस रद्द असणार आहेत.
फलाट विस्तारीकरणात करण्यात येणारी कामे- फलाट क्रमांक १२/१३ ची लांबी ६९० मीटरपर्यंत वाढवणे.
- ३१ ओव्हरहेड केबल स्थानांतर करणे.
- ३४ सिग्नल यंत्रणेची जोडणी.
- ०.५ किमी लांबीचे रेल्वे रुळांची उभारणी.