नागपूर - आजच्या युगामध्ये वाढते ऊर्जेचे प्रमाण व त्याला लागणारा कोळसा व पाणी याची मुख्य चिंता वाढत आहे. त्यातून असंख्य वाहनातून निघणारा धूर वातावरण दूषित करून नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करीत आहे. त्यामुळे श्वसनाचे, हृदयाचे आजार बळावत आहे.
यावर नवीन संशोधनातून उपाय शोधणे काळाची गरज असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनासाठी चालत असताना अतिरिक्त ऊर्जेची निर्मिती करणारे संशोधन विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे आणि विभागातील एमएससी भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी मरसियाना सिल्वेस्टर यांनी केले आहे. या संशोधनासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविले आहे.
पिझोइलेक्ट्रिक दबाव यंत्राच्या सिद्धांताने तयार होणाऱ्या ऊर्जेची गुणवत्ता ही अति उत्तम असून यातून कोणत्याच प्रकारे कार्बन डायऑक्साइडची निर्मिती होत नाही. त्यामुळे वातावरणात कार्बनची मात्रा या संशोधनाद्वारे वाढत नसून संशोधन पर्यावरण पूरक आहे, असे समजले जाऊ शकते. आजच्या वेळी विद्युत ऊर्जेवर चालणारी वाहने रस्त्यावर धावताना दिसतात.
त्यामुळे त्या विद्युत ऊर्जेची निर्मिती सर्वतः संबंधित पाॅवर प्लांटवर अवलंबून आहे. त्यामुळे कोळसा व पाणी दोन्ही वेळेनुसार आवश्यकता वाढू शकते. या संशोधनामुळे चालत असणाऱ्या वाहनातून विजेती निर्मिती होऊन ऊर्जेची बचत देखील केली जाऊ शकते.
स्वच्छ ऊर्जा व ऊर्जेची बचत या दोन्ही गोष्टी आजचे संशोधन व त्यावर मिळालेले आंतरराष्ट्रीय पेटंट काळाची गरज ठरणारे आहे, असे डॉ. संजय ढोबळे म्हणाले. पिझोइलेक्ट्रिक मटेरियलचा वापर करीत दबाव यंत्राची कल्पना करून डॉ. संजय ढोबळे व मरसियाना सिल्वेस्टर यांनी मिळून वाहन चालत असताना विजेची निर्मिती करून आणि ती संग्रहित करून वाहन चालण्यासाठी उपयोगात आणली जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे. पिझोइलेक्ट्रिक पदार्थ फार स्वस्त असून कमी खर्चामध्ये विजेची निर्मिती करते. शिवाय स्वच्छ वीज निर्मिती करीत समाजपयोगी संशोधन त्यांनी केले आहे.
विद्यापीठाकडून कौतूक
उत्कृष्ट व समाजपयोगी केलेल्या संशोधनामुळे तसेच पेटंट प्राप्त केल्याने डॉ. संजय ढोबळे व मरसियाना सिल्वेस्टर यांचे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, संशोधक विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे. डॉ. ढोबळे व मरसियाना यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले आहे.