नागपूर - जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समतानगर येथील अन्वर लेआऊट येथे ड्रममध्ये एका ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
रितेश रामटेके (रा. कौसल्यानगर अजनी) असे मृतकाचे नाव आहे. तो पेंटिंगचे काम करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश याची गेल्या १५ वर्षांपासून गोपाल बेसरकर याच्यासोबत मैत्री आहे. रितेशने गोपाल याच्या मोबाइलवर बुधवारी (ता.२६) संपर्क केला. यावेळी त्याने गोपालला ‘माझी मानसिकस्थिती खालावली असून मला दवाखान्यात घेऊन चल’,असे म्हणाला.
त्यावरून गोपाल याने त्याला कोराडी मार्गावरील मनोरुग्णालयात नेले. मात्र, महाशिवारात्रीनिमित्ता सुटी असल्याचे कळल्याने तो त्याला घेऊन परत आला. त्यानंतर गोपाल रितेशसोबत दिवसभर फिरला. रात्री रितेशने गोपाल याच्याकडेच जेवण केले. त्यानंतर रितेश हा बाहेर तर गोपाल आतमध्ये झोपला.
आज गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास गोपाल उठला असता, त्याला रितेश आढळून आला नाही. त्यामुळे त्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी रितेश त्याच्या घरासमोरीस धुर्वे यांच्या घराजवळ ठेवलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये बुडालेला आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी जरीपटका पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी ताफ्यासह परीसर गाठला. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. याशिवाय चौकशी करून आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.