आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. बी ग्रुपचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. बी ग्रुपमधील या सामन्यात 1 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे. इंग्लंड या स्पर्धेतून आधीच बाहेर झाली आहे. इंग्लंडला या स्पर्धेत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे इंग्लंडसाठी तिसरा सामना हा प्रतिष्ठेचा असणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा तिसरा सामना जिंकून विजयी हॅट्रिकसह उपांत्य फेरीतील प्रवेश सुनिश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे.
टेम्बा बावुमा हा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. जोस बटलर याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. जोस बटलर याचा हा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असणार आहे. बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडला या स्पर्धेत पहिले 2 सामने गमवावे लागले. यासह इंग्लंडचं चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान संपुष्ठात आलं. बटलरने या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शुक्रवारी 28 फेब्रुवारीला कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे आता बटलरचा जाता जाता आपल्या नेतृत्वात इंग्लंडला विजयी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा पावसामुळे निकाल लागू शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. ऑस्ट्रेलियाचे यासह 4 गुण झाले आणि त्यांनी ब गटातून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. इंग्लंडचा आधीच पत्ता कट झाला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचंही जवळपास सेमी फायनलचं तिकीट निश्चित आहे. मात्र अफगाणिस्तानच्या जर तरच्या आशा कायम आहेत. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला 200 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने पराभूत केलं, तरच अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहचेल. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना कमी धावांच्या/विकेट्सच्या फरकाने गमावला तरीही ते उपांत्य फेरीत पोहचतील.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंड टीम: फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद, टॉम बँटन, गस ऍटकिन्सन आणि रेहान अहमद.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी दक्षिण आफ्रिका टीम : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, तबरेझ शम्सी आणि कॉर्बिन बॉश.