लंडन : आपल्या भूप्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी युरोपला मोठा त्याग करावा लागणार आहे, इतिहासातही असे अनेक प्रसंग आले होते, असे म्हणत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी रशियाला रोखण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. युक्रेनला अधिक शस्त्रपुरवठा करण्याचे जाहीर करतानाच स्टार्मर यांनी १.६ अब्ज पौंड इतक्या किमतीचे पाच हजार क्षेपणास्त्र पुरविणार असल्याचेही स्पष्ट केले.
युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी स्टार्मर यांनी युरोपीय देशांची बैठक बोलावली होती. या बैठकीला युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की हेदेखील उपस्थित होते. यावेळी स्टार्मर यांनी इतर युरोपीय नेत्यांना संरक्षणावरील खर्च वाढविण्याचे आवाहन केले.
झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या वादामुळे ट्रम्प हे अविश्वासार्ह बनले असल्याचा आरोपही स्टार्मर यांनी फेटाळून लावला. स्टार्मर म्हणाले,‘‘इतिहासात डोकावले तर, युरोपमध्ये संघर्ष झाल्यास त्याची झळ आपल्या सर्वांनाच बसते, हे लक्षात येते. रशियाकडून शांततेची मागणी होत असले तरी ते त्यांच्या हल्ल्यांची धारही कमी करताना दिसत नाहीत. त्यामुळे युरोपमध्ये शांतता हवी असल्यास अमेरिकेचे पाठबळ आवश्यक आहे.’’
शांतता चर्चा पुन्हा सुरू होण्यात हातभार लागावा यासाठी प्रयत्नशील असल्याने झालेल्या वादामध्ये तेल न ओतता ट्रम्प, झेलेन्स्की, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना एकत्र घेत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे स्टार्मर यांनी सांगितले. ‘‘युरोपला अनेकवेळा युद्धाची झळ बसली असून आत्मसंरक्षण करण्यासाठी युरोपला मोठा त्याग करावा लागला आहे. आताही आपल्याला संरक्षणावरील खर्च वाढवावा लागणार आहे.
माझा ट्रम्प यांच्यावर विश्वास आहे, पण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यावर नाही,’’ असे स्टार्मर यांनी स्पष्ट केले. संरक्षणखर्च वाढविणार ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांच्या देशाच्या संरक्षण खर्चात २०२७ पर्यंत अडीच टक्क्यांनी वाढ करण्याचे जाहीर केले. इतर युरोपीय देशही हाच मार्ग अनुसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एकूण सकल उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपर्यंत संरक्षण खर्च वाढवावा, असे आवाहन ब्रिटनने युरोपीय देशांना केले आहे.
बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा
युरोपीय देशांच्या संयुक्त फौजा युक्रेनमध्ये पाठविणे
अमेरिकेकडून सुरक्षेची हमी मिळविणे
शस्त्रसंधी कायमस्वरूपी हवी
सीमेवर शांतता कायम राखण्यासाठी युक्रेनला शस्त्रसज्ज करावे
चीन आणि आशियातील इतर देशांबरोबर तडजोडी करताना ट्रम्प यांनी आपले धोरण बदलणे समजण्यासारखे आहे. मात्र आपणही फार पूर्वीच जागे होणे गरजेचे होते. मी आधीपासून सांगतो आहे की युरोपने एकसंध, अधिक स्वायत्त आणि अधिक शक्तिशाली होणे आवश्यक आहे.
- इमॅन्यूएल मॅक्रॉन; अध्यक्ष, फ्रान्स
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठीचा करार अद्याप फारच दूर आहे. वाद झाला असला तरी अमेरिका आम्हाला पाठबळ देईल, असा मला विश्वास आहे. आमच्यातील राजनैतिक संबंध नैसर्गिक असून अमेरिकेने संपूर्ण युद्धकाळात आम्हाला बळ दिले आहे.
- व्होलोदीमिर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन
युरोपसमोर कसोटीचा प्रसंग उभा राहिला आहे. त्यामुळे युरोपीय देशांना शस्त्रास्त्रांवरील खर्च वाढवावाच लागेल आणि तो जीडीपीच्या तीन टक्क्यांपर्यंत न्यावा लागेल. आपण आपले प्रयत्न वाढविले नाहीत, तर आक्रमक आपल्यावर अटी लादतील आणि आपली अवस्था बिकट होईल.
- पीटर फिएला, पंतप्रधान, चेक रिपब्लिक