चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने जिंकले आहे. भारताने रविवारी दुबईला झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली. भारतीय संघाचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आहे.
भारताने १२ वर्षांनंतर पुन्हा विजेतेपद जिंकले आहे. तसेच रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी २००२ मध्ये सौरव गांगुली आणि २०१३ मध्ये एमएस धोनी यांच्या नेतृत्वात भारताचे नाव चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरले होते.
या सामन्यात न्यूझीलंडने २५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने ४९ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केला.
भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सरुवात केली होती. एका बाजूने शुभमन गिल संयमी खेळत असताना दुसऱ्या बाजूने रोहित शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने चौकार षटकारांची बरसात केली आणि ४१ चेंडूत त्याचे अर्धशतक केले. त्याने शुभमन गिलसोबत शतकी भागीदारीही केली.
या भागीदारीदरम्यान डॅरील मिचेलकडून शुभमन गिलचा झेल सुटला होता. पण अखेर शुभमन गिलला सँटेनरने १९ व्या षटकात बाद केले. गिलचा अविश्वसनीय झेल ग्लेन फिलिप्सने घेतला. गिलने ५० चेंडूत ३१ धावांची खेळी केली.
गिल बाद झाल्यानंतर लगेचच विराट कोहलीलाल १ धावेवर मायकल ब्रेसवेलने पायचीत पकडले. रोहितलाही २७ व्या षटकात रचिन रवींद्रने बाद केले. रोहित ८३ चेंडूत ७६ धावांवर यष्टीचीत झाला. त्याने या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार मारले.
तो बाद झाल्यानंतर मात्र श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला. त्यांनी एकेरी-दुहेरी धावा करत डाव पुढे नेला. यादरम्यान, श्रेयस अय्यरचा झेल काईल जेमिसनकडून सुटला होता. पण त्याला मिळालेले जीवदान न्यूझीलंडसाठी महागात पडला नाही.
त्याला ३९ व्या षटकात श्रेयस अय्यरला मिचेल सँटेनरने ४८ धावांवर बाद केले. त्याचा अफलातून झेल रचिन रवींद्रने घेतला. त्यानंतर ४२ व्या षटकात ब्रेसवेलने २९ धावांवर अक्षर पटेलला बाद केले. पण नंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी डाव सावरला.
पण हार्दिकला ४८ व्या षटकात १८ धावांवर काईल जेमिसननने बाद केले. पण नंतर उर्वरित धावा केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने पूर्ण केल्या. जडेजाने विजयी चौकार मारला. जडेजाने नाबाद ९ धावा केल्या, तर केएल राहुलने नाबाद ३४ धावा केल्या.
न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल आणि कर्णधार मिचेल सँटेनर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. काईल जेमिसन आणि रचीन रविंद्र यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ बाद २५१ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल आणि मायकल ब्रेसवेल यांनी अर्धशतके केली. डॅरिल मिचेलने १०१ चेंडूत ६३ धावांची खेळी केली.
मायकल ब्रेसवेलने ४० चेंडूत ५३ धावांची नाबाद खेळी केली. ग्लेन फिलिप्सने ३४ धावांची चांगली खेळी केली, तर सुरुवातीला रचिन रवींद्रने आक्रमक खेळ करत २९ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या.
भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तसेच मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.