कऱ्हाड : यशवंतराव चव्हाण असताना किवळकर, चोरेकर, पार्लेकर हे त्यांच्यासोबत होते. त्यांचे एकमत न झाल्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी सह्याद्री कारखाना पाहण्यासाठी पी. डी. पाटील यांचे नाव सुचवले. कारखान्याशी माझा काहीही संबंध नाही, माझा ऊसही नाही. मात्र, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, ही यशवंतराव चव्हाण यांचीच शिकवण होती. तेथे दुसऱ्या कोणाला संधी मिळाली नाही. सभासदांना सर्वांना संधी मिळाली पाहिजे, त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून मला करावे लागेल, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी खासदार भोसले हे येथे आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुनील काटकर, राजेंद्र यादव, विजय यादव आदी उपस्थित होते.
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात खासदार भोसले म्हणाले, ‘‘ज्यावेळी सत्तेचे विकेंद्रीकरण होते, त्या वेळी लोकांचा सहभाग असतो. कोणतीही सहकारी संस्थेचा अध्यक्ष, संचालक यांना जेवढा अधिकार असतो, तेवढाच अधिकार सभासदालाही असतो. मात्र, दुर्दैवाने बऱ्याचदा मी चेअरमन झालो, की मला त्या संस्थेचा मालक असल्याचे वाटायला लागते. सहकारी तत्त्वावर ज्या संस्था आहेत. त्या खासगी पद्धतीने चालवण्यात आल्या. संबंधित सहकारी संस्था खासगी पद्धतीने चालवली जात असेल, तर त्यांनी खासगी कारखाना काढायला हवा होता. त्यामुळे निवडणूकच लागली नसती.’’
शिवरायांनी भेदभाव केला नाही
मुस्लिम लोकांकडून मटण खरेदी न करता हिंदू लोकांकडून खरेदी करा, असे वक्तव्य मंत्री नीतेश राणे यांनी केले. त्यावर उदयनराजे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे. मी राणे यांचे वक्तव्य ऐकले नाही; पण छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभाव ही संकल्पना होती. जर तसा भेदभाव केला असता, तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो. नीतेश राणेंना असे म्हणायचे असेल. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे, ते खोदून काढा तर मी किती वेळा तरी सांगितले आहे, तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते, तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो हे विसरू नका. त्याचा अर्थ तसा काढू नका. मी नॉनव्हेज खात नाही.