नागपूर : विदर्भातील भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हे सोडले, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दुधाचे उत्पादन फार कमी होते. पण आता मदर डेअरी प्रकल्पाच्या निमित्ताने विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याची संधी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. १६) केले.
मराठवऱ्हाड दुग्ध उत्पादक संघटनेचा प्रारंभ तसेच धारा खाद्य तेल पॅकिंग केंद्राचे भूमिपूजन तसेच मदर डेअरीच्या बुटीबोरी स्थित मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टच्या कामाचा प्रारंभ मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. तेलंगखेडी मार्गावरील मदर डेअरी प्लान्ट येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी ‘एनडीडीबी’चे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचे मनीष बंदलिश, नॅशनल डेअरी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी. पी. देवानंद आदींंची प्रमुख उपस्थिती होती.