सोने आणि शेअर बाजार
esakal March 17, 2025 01:45 PM

पद्मनाभ वैद्य - भांडवली बाजार अभ्यासक व विश्लेषक

गुंतवणुकीच्या क्षेत्रात यश मिळवण्याचे एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे ‘बाय द फिअर अँड सेल द ग्रीड’. याचा अर्थ असा, की जी अॅसेट वर्तमानात तेजीत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे, ज्याची किंमत अजून वाढेलच असा सर्वांना विश्वास आहे आणि लोकांच्या मनात त्या अॅसेटसंबंधी फोमो (फिअर ऑफ मिसिंग आउट) तयार झाला आहे, अशी अॅसेट फायद्यामध्ये विकून ज्या अॅसेटमध्ये भीती, संशय, अनिश्चितता आहे त्यामध्ये गुंतवणूक करणे.

आजघडीला सोन्यामध्ये आपल्याला ‘ग्रीड’ बघायला मिळत आहे, त्याला कारणे देखील तशीच आहेत जसे, की जागतिक अर्थव्यवस्थांमधील अनिश्चितता, डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक धोरणे, इस्राइल-हमास, रशिया-युक्रेन युध्द, जागतिक मध्यवर्ती बँकांची सोनेखरेदी यामुळे मागील काही वर्षांत आपल्याला सोन्यात भरपूर तेजी बघायला मिळाली. कारण एकूण अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा जेव्हा अस्वस्थता बघायला मिळते, तेव्हा सोन्याकडे एक अतिशय सुरक्षित पर्याय म्हणून बघितले जाते. त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांचे त्याकडे लक्ष जाणे साहजिकच आहे; परंतु मागील काही वर्षांचा इतिहास बघितला तर साधारणतः दरवर्षी सोन्यातून ८-९ टक्के इतका परतावा मिळाला आहे, असे दिसते. त्यामुळे आताची ३० टक्के वाढ ही काहीशी अनैसर्गिक वाटत आहे. त्यामुळे आता सोन्यामधून टप्प्याटप्प्याने ‘प्रॉफिट बुकिंग’ करून हळूहळू शेअर (इक्विटी) बाजारामध्ये गुंतवणूक करणे इष्ट होईल, असे वाटते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे-

मागील एका वर्षाचा (१० मार्च २०२४ - १० मार्च २०२५) या काळातील सोन्याचा ‘रोलिंग रिटर्न’ पाहिला, तर सोन्याने ३०.११ टक्के परतावा, तर ‘सेन्सेक्स’ने याच काळात ०.८२ टक्के परतावा दिला आहे. मागील २० वर्षांतील सोन्याच्या ‘रोलिंग रिटर्न’चा अभ्यास केला असता असे दिसून येते, की जेव्हा जेव्हा एका वर्षात सोन्याने ३०-४० टक्के परतावा दिला आहे, तिथून नजीकच्या भविष्यात तो परतावा कमी होत गेला आहे. त्यामुळे येथून पुढे सोन्याचा भावात खूप वाढ अनिश्चित दिसत आहे.

‘गोल्ड ईटीएफ’मधील गुंतवणुकीने नवा उच्चांक गाठला आहे. ‘ॲम्फी’च्या डेटानुसार, २०२४ या वर्षात ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये ९२२४ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी झाली, ही पातळी २०२२ मध्ये ४६० कोटी रुपये इतकीच होती. या उलट ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या डेटानुसार, भारतात सोन्याच्या मागणीमध्ये सलग तिसऱ्या वर्षी घट दिसत आहे. यानुसार असे वाटते, की बरेच लोक ट्रेडिंग किंवा कमी कालावधीच्या मानसिकतेतून सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत, जे ‘फोमो’चे लक्षण वाटत आहे.

शेअर बाजारात मागील सहा महिन्यांत आलेल्या मंदीमुळे लार्ज कॅप इंडेक्सचे मूल्यांकन (व्हॅल्युएशन) आकर्षक झाले आहे. लार्ज कॅपचा आताचा ट्रेलिंग पीई रेशो २०.२ आहे. कोविड महासाथीच्या काळात (मार्च २०२०), रशिया-युक्रेन युद्ध (जून २०२२) या काळात देखील पीई रेशो १८-१९ च्या पातळीजवळ आल्यानंतर बाजारामध्ये ‘रिव्हर्सल’ बघायला मिळाले होते, म्हणून लार्ज कॅप इंडेक्समध्ये ‘रिकव्हरी’ अपेक्षित आहे. मिड आणि स्मॉल कॅपमध्ये मूल्यांकन आकर्षक वाटत नाही. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे २०२५ साठी सोन्याच्या भावाचे रु. ८५,००० (१० ग्रॅम) लक्ष्य होते, फेब्रुवारी महिन्यातच ही पातळी सोन्याने ओलांडली असून, आता ‘एमसीएक्स’वरील सोन्याचा भाव रु. ८६,००० च्या आसपास रेंगाळत आहे.

या सर्वांचा सारांश सांगायचा झाला, तर सोन्यामध्ये गुंतवणूकदारांना गेल्या वर्षी चांगलाच फायदा झाला आहे, तर आता काही प्रमाणात टप्प्याटप्प्याने नफावसुली करून ते पैसे हळूहळू लार्ज कॅप शेअरमध्ये गुंतविणे श्रेयस्कर ठरेल, असे वाटते. जागतिक पातळीवर अजूनही अनिश्चितता पूर्णपणे संपलेली नाही आणि एक गोंधळाची स्थिती आहे.

त्यामुळे सोन्यात अजूनही थोडी तेजी संभवू शकते; परंतु, सध्या तेथे ‘रिस्क-रिवॉर्ड रेशो’ आकर्षक वाटत नाही, तर लार्ज कॅप शेअरमध्ये तो अनुकूल वाटत आहे. (डिस्क्लेमरः लेखकाने त्याच्या अभ्यासानुसार मत व अंदाज व्यक्त केले आहेत. बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वत्ःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

भांडवली बाजार अभ्यासक व विश्लेषक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.