पुणे : ‘‘धर्म आणि निसर्गाचे रक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे. कारण, नद्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत. संत महात्म्यांनी नदीच्या काठीच आपले आयुष्य घालवले आहे. आज इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी यांसह इतर तीर्थस्थळातून वाहणाऱ्या नद्यांची स्थिती बरी नाही. नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी लोक चळवळ व्हायला हवी. असे झाल्यास सर्व नद्या स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाहीत. देशातील आदर्श नद्या महाराष्ट्रात आहेत, असा लौकिक करण्यासाठी ही लोक चळवळ उभी करू’’, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र देहू येथे आज केले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याला उत्तर देताना शिंदे बोलत होते. सन्मानचिन्ह, पगडी, वीणा आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री संत एकनाथ महाराज संस्थान, श्री संत नामदेव महाराज संस्थान, श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, संत मुक्ताई माता संस्थान, श्री संत सोपानदेव महाराज संस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘‘संत तुकोबारायांचा आशीर्वाद म्हणजे हा पुरस्कार आहे. ही त्यांची प्रेरणा आहे. जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, माझ्या कामावर आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आहे. हा पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्या जीवनातील आनंदाचा, समाधानाचा क्षण आहे.’’
‘भंडारा डोंगर पायथ्याशी कॉरिडॉर’‘‘श्रीक्षेत्र भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. तेथे येणाऱ्या भाविकांना सेवा-सुविधा मिळण्याच्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याला कॉरिडॉर करण्यात येणार आहे. त्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा करून तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
शिंदे म्हणाले...राज्याच्या अधिष्ठानापेक्षा धर्माचे अधिष्ठान वरचे आहे. ज्ञानोबा- तुकोबांचा जयघोष जगातील सर्वश्रेष्ठ ऊर्जा आणि प्रेरणा आहे. ज्ञानोबा महाराष्ट्राचा श्वास तर तुकोबाराय प्रश्र्वास आहेत.
तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी क्लिष्ट असे तत्त्वज्ञान सोप्या मराठीत सांगितले. खरे तर हाच मराठी भाषेचा अभिजात दर्जा होता.
राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना संत तुकाराम गाथा वाचनासाठी उपलब्ध करून देणे, गायरान वारकऱ्यांना मिळावे या मागण्या पूर्ण करू.
मारोती महाराज कुऱ्हेकर यांना पद्मश्री देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू.