नागपुरात दंगल नेमकी कुणी घडवली हा संशोधनाचा विषय, उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला
Marathi March 21, 2025 08:24 AM

नागपूर दंगलीत ज्यांनी महिला पोलिसांवर हात टाकला त्यांचे हात छाटले पाहिजेत आणि त्यासोबतच कोणी जाणीवपूर्वक ही दंगल भडकवली असेल तर त्यांनाही कायद्याचा इंगा दाखवला पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात जे चाललेय त्याच्यावर न बोलता जुने विषय उकरून दंगली घडवल्या जातायत. नागपुरात नेमकी कुणी दंगल घडवली हा संशोधनाचा विषय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नागपुरात आरएसएसचे मुख्यालय आहे. तिथे 30 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा तो गड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते होम पिच आहे. तिथे जातीय दंगल झाली. औरंगजेबाचे थडगे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. महाराष्ट्रात त्याचे पडसाद कुठेही उमटले नाहीत, पण नागपूरमध्ये दंगल झाली. अधिवेशन सुरू असताना आणि पंतप्रधानांची नागपूर भेट नियोजित असताना नागपूरमध्ये नेमकी दंगल कुणी घडवली हा संशोधनाचा विषय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नागपुरात दंगल घडते आणि त्याचवेळी अधिवेशनात भाजपचे आमदार नगरविकास खाते आणि ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणत आहेत. मग नेमकी ही दंगल आहे तरी कुणाची, की हा निव्वळ योगायोग आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार अपयश लपवायला एकेक गोष्ट करतेय, पण त्यातही ते अपयशी होत चालले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

थडग्याला संरक्षण दिले कुणी?

औरंगजेबाच्या थडग्याभोवती पंधरा फुटांचे पत्रे लावलेत असे पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले असता, थडग्याला संरक्षण दिले कुणी? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

औरंगजेबाचे थडगे उखडायचेय तर उखडून टाका, कुणीही शिवप्रेमी औरंगजेबाचा प्रेमी असूच शकत नाही, पण दुतोंडी भूमिका घेऊ नका, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.

संघाला धन्यवाद देतोय की त्यांनी कान टोचले, पण ते किती काळ उपयोगी पडताहेत ते बघूया की 30 तारखेनंतर आणखी काही होईल हेसुद्धा पाहण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.