नवी दिल्ली : भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग आणि ज्योती जगताप यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकली आहे.
दरम्यान या प्रकरणातील अन्य आरोपी महेश राऊत याला देण्यात आलेल्या जामिनाला आक्षेप घेत राष्ट्रीय तपास संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायाधीश एम. एम. सुंदरेश आणि न्यायाधीश राजेश बिंदाल यांच्या खंडपीठाने पुढे ढकलली आहे.
एल्गार परिषद- भीमा कोरेगाव प्रकरणातील बहुतांश आरोपींवर गैरकृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (युएपीए) कारवाई करण्यात आली आहे. सुरजगड खाणीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने पेटविण्यात आली होती. यासंदर्भात सरकारकडील संवेदनशील माहिती तसेच नकाशे गडलिंग यांनी माओवाद्यांनी दिल्याचे एनआयएचे म्हणणे आहे.
दुसरीकडे कबीर कला मंचच्या सदस्या असलेल्या ज्योती जगताप यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेवेळी प्रक्षोभक घोषणा दिल्याचा राष्ट्रीय तपास संस्थेचा आरोप आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये जगताप यांना जामीन देण्यास नकार दिला होता. याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.