Maharashtra Weather : सूर्य तळपला; पारा ४२ अंशांवर, दक्षिणेकडील जिल्ह्यांत पावसाला पोषक हवामान
esakal March 28, 2025 01:45 PM

पुणे : सूर्य तळपल्याने राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळिशीपार गेले आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांगली जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी (ता. २८) राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून, दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने काल सायंकाळनंतर सांगली जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सांगली आणि मिरज येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होत आहे.

अकोलासह ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे आज तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक, तर जळगाव, अमरावती, यवतमाळ, मालेगाव, परभणी, नागपूर, वर्धा, वाशीम येथे तापमान ४० अंशांच्या वर होते. धुळे, जेऊर, सोलापूर, भंडारा आणि गडचिरोली येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान असून, चटका आणि उकाडा वाढला आहे. आज (ता. २८) राज्यात कमाल तापमानातील वाढ, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.