Water Crisis : मंत्रालयात टँकरने पाणीपुरवठा; टंचाईमुळे चार दिवसांपासून गैरसोय
esakal March 28, 2025 01:45 PM

मुंबई : राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयालाच मागील चार दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. राज्यातील पाणी टंचाईवर अधिवेशन काळात विधिमंडळात चर्चा झाली; मात्र तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालयातील पाणी टंचाईची कोणी दखल घेतली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

मंत्रालयातील पाणीटंचाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपासून (ता.२४) ठिकाणी कमी प्रमाणात पाणीपुरवठा सुरू होता. मात्र बुधवारी व गुरुवारी या टंचाईचा मोठा फटका बसला. मंत्रालयातील दालने, स्वच्छतागृहे आणि कॅन्टीन या सर्व ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली. पाणी नसल्याने अनेक स्वच्छतागृहांत दुर्गंधी पसरली होती. पाणी उपलब्ध नसल्याची कोणतीही सूचना विभागांना देण्यात आली नव्हती. तसेच हा पाणीपुरवठा केव्हा सुरळीत होणार, याचीही माहिती देण्यात आली नसल्याची तक्रार अधिकारी वर्गाकडून करण्यात आली.

बुधवारी अधिवेशन संपल्यानंतर गुरुवारी मंत्रालयातील गर्दी वाढली. त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येला तोंड फुटले. मंत्रालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांनी तक्रारीस सुरुवात केली, कारण सर्वाधिक अडचण झाली ती बाहेरून कामानिमित्त आलेल्या अभ्यागतांची. एक तर त्यांनी आणलेल्या पाण्याच्या बाटल्या प्रवेशद्वारावर काढून घेतल्या गेल्या. तर मंत्रालयात आल्यानंतर पिण्यास पाणी मिळत नसल्याने, त्यांच्यावर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली. कॅन्टीनमध्येही पाणी उपलब्ध झाले नाही.

अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ

मंत्रालयात निर्माण झालेल्या या पाणीबाणीवर उपाय म्हणून, महापालिकेकडून पाण्याचे टँकर मागवून, मंत्रालयातील पाण्याच्या टाक्या भरण्यात आल्या. मात्र त्यालाही मर्यादा आल्या. तसेच वेळेत टँकर न आल्याने अधिकारी, कर्मचारी यांची धावपळ आणि संतापही यावेळी पाहायला मिळाला. पाणी टंचाईच्या प्रश्नावर, लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.