मोरगाव, ता.२२ : ‘‘बारामती तालुक्यात २०२४ -२५ या वर्षात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने तीन लाख मर्यादेपर्यंत तीनशे पाच कोटी ८२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले होते. शून्य टक्के व्याजदराचा लाभ घेण्यासाठी या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२५ पूर्वी हे कर्ज वेळेत भरून नियमित शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज योजनेचा लाभ घ्या,’’ असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बारामतीचे विभागीय अधिकारी संदीप जगताप यांनी केले आहे.
विकास संस्थांच्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शून्य टक्के व्याजदराने मिळणारे पीक कर्ज हे अल्पभूधारक शेतकऱ्यांना फार मोठा आधार आहे. त्यामुळे सोसायटी कडून मिळणारे पीक कर्ज शेतकऱ्यांना आधारभूत ठरते. ३१ मार्च अखेर हे पीक कर्ज भरून एप्रिलमध्ये पुन्हा नवीन आर्थिक वर्षात शून्य टक्के व्याजदर योजनेचा लाभ घेता येतो. बारामती तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण ३२ शाखा असून त्यामध्ये २९ शाखांद्वारे शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज वाटप केले जाते. या २९ शाखांच्या अंतर्गत विविध गावांमध्ये १८९ विकास संस्था आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०२४ - २५ या वर्षात २९ शाखांच्या व १८९ विकास संस्थांच्या माध्यमातून २६,६२६ शेतकरी सभासदांना २४७२०.४४ हेक्टरवर ३०५ कोटी ८२ लाख पंधरा हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. हे संपूर्ण पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने असून ३१ मार्च २०२५ पर्यंत पीक कर्ज भरण्याची मुदत आहे.