आमदारांकडून मानपाडा पोलिसांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : डोंबिवलीत शाळेत जाणाऱ्या सातवर्षीय चिमुरड्याचे रिक्षाचालकाने अपहरण केल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) घडली. मानपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच साडेतीन तासांत आरोपींचा शोध घेत मुलाची सुखरूप सुटका केली. कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करीत सत्कार केला.
मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित सोसायटीमधून सात वर्षांच्या विद्यार्थ्याला शाळेत सोडण्यासाठी रिक्षा आली होती; मात्र दररोज विद्यार्थ्याला शाळेत सोडणारा रिक्षाचालक शुक्रवारी आला नव्हता. त्याच्या जागी त्याचा भाऊ आला होता. तो अधूनमधून येत असल्याने पालकांनी आपल्या मुलाला त्याच्यासोबत जाऊ दिले. मिळालेल्या संधीचा फायदा घेत रिक्षाचालकाने मुलाचे अपहरण करून चक्क दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. दोन कोटींच्या मागणीनंतर पालकांनी तत्काळ मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे फिरवत साडेतीन तासांत शहापूर-नाशिक महामार्गावरून रिक्षाचालकासह त्याच्या अन्य साथीदारांना अटक केली.
सात वर्षांच्या मुलाची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. मानपाडा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुक्रवारी सायंकाळी स्थानिक आमदार राजेश मोरे यांनीदेखील मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांचे कौतुक केले. या वेळी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख राजेश कदम, विवेक खामकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.