संजय राठोड, साम टीव्ही
यवतमाळ : यवतमाळच्या आर्णी इथे एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली असून उद्या वाढदिवस असलेल्या ओम बुटलेवर तिघांनी तलवार आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. ओम बुटले (वय २३, रा. आर्णी) असं हल्ल्यातील गंभीर जखमी असलेल्या तरुणाचं नाव आहे. सध्या त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी झालेल्या भांडणातून कोळवण येथील अजय तिघलवाड याचा ओम बुटले आणि दत्ता वानखडे यांनी खून केला होता.
१५ दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. पुण्याला बायकोला काही कामासाठी घेऊन जात असताना अवधूत तिघलवाड आणि अन्य दोघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ओम बुटले हा गंभीर जखमी झाला आहे. अवधूत तिघलवाड पोलिसांच्या ताब्यात असून आर्णीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ओम बुटलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत अजय तिघलवाड याच्या वडिलांचा देखील या हल्ल्यात हस्तक्षेप असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.