दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विशाखाटपट्टणमध्ये सामना होत आहे. तसं पाहिलं तर या मैदानात दिल्ली कॅपिटल्सचा वरचष्मा राहिला आहे. पण पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी पाहून काय होईल सांगता येत नाही. अशा स्थितीत नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून आता काही दिल्लीचं खरं नाही असं वाटत होतं. पण झालं भलतंच.. सनरायझर्स हैदराबाद पूर्ण 20 षटकंही खेळू शकला नाही. 18.4 षटकात सर्व गडी गमवून 163 धावा केल्या आणि विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं. अभिषेक शर्मा रनआऊट झाल्यानंतर विकेटची रांग लागली. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात विसंवाद झाल्याने अभिषेक शर्माला विकेट द्यावी लागली. त्यानंतर आलेल्या इशान किशनकडून फार अपेक्षा होत्या. मात्र काही खास करू शकला नाही. फक्त 2 धावा केल्या आणि बाद झाला. नितीश कुमार रेड्डी मैदानात आला आणि दोन चेंडू खेळला. त्याला मिचेल स्टार्कने तंबूचा रस्ता दाखवला. त्याला खातंही खोलता आलं नाही. ट्रेव्हिस हेड 22 धावांवर असताना त्याला स्टार्कने चालतं केलं. हेनरिक क्लासेने आणि अनिकेत वर्मा यांनी डाव सावरला. दोघांनी मिळून 61 धावांची भागीदारी केली.
एकीकडे धडाधड विकेट पडत असताना अनिकेत वर्माने दांडपट्टा चालवला. टप्प्यात आलेला चेंडू सीमेपार पाठवण्याचं काम करत राहिला. त्याने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण दुसऱ्या बाजूला विकेट पडत असल्याचं पाहून त्यानेही हात खोलला. संघावरील दडपण दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 74 धावांची खेळी केली. त्याची विकेट काढण्यात कुलदीप यादवला यश आलं. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने तीन गडी बाद केले.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी