सराईत चोरट्याला रेल्वे क्राइम ब्रँचकडून अटक
पाच लाखांचे मोबाईल, आयपॅड, दागिने हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या महागड्या वस्तू चोरणाऱ्याला कल्याण रेल्वे क्राइम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेले जवळपास पाच लाखांचे मोबाईल, आयपॅड, दागिने आणि इतर वस्तू हस्तगत केल्या आहेत. सहिमत शेख असे या चोरट्याचे नाव असून, तो नवी मुंबईचा राहणारा आहे. त्याच्याकडून आतापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास रेल्वे क्राइम ब्रँच पोलिस करीत आहेत.
लांब पल्ल्यांच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळेस प्रवासी झोपेत असताना किंवा प्रवाशांची नजर चुकवून प्रवाशांच्या बॅगा चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे क्राइम ब्रॅंचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला होता. साध्या वेशात मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये तसेच स्थानक परिसरात पोलिसांनी गस्ती वाढवल्या होत्या. अशाच प्रकारे निजामुद्दीन मेल एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे पोलिस तपास करताना हा सराईत चोरटा बदलापूर येथे लपून बसल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बदलापूर येथे सापळा रचत सहिमत शेख या सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या. पोलिस तपासात त्याने केलेले सहा गुन्हे उघड झाले आहेत.