भारतात सध्या आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सामने खेळवण्यात येत आहे. या हंगामाकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया क्रिकेटने मोठी घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून 30 मार्च रोजी मायदेशात होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांच वेळापत्रक जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या या वेळापत्रकानुसार मेन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तसेच टीम इंडियाची महिला ब्रिगेडही ऑस्ट्रेलियाचा दरा करणार आहे. वूमन्स टीम इंडिया 2026 मध्ये ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन वूमन्स टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलंय.
वूमन्स टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20I आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तसेच उभयसंघात एकमेव कसोटी सामनाही खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टी 20I मालिकेने करणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येईल. तर एकमेव कसोटी सामन्याने वूमन्स टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता होईल. या कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. वूमन्स टीम इंडियाने शेवटची पिंक बॉल टेस्ट मॅच 2021 साली खेळली होती.
उभयसंघातील टी 20I मालिकेला 15 फेब्रुवारी 2026 रोजी सुरुवात होईल. मालिकेतील सलामीचा सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करणयात आला आहे. दुसरा सामना हा 19 फेब्रुवारीला मानुका ओव्हल, कॅनबेरा येथे होणार आहे. तर तिसरा आणि शेवटचा टी 20I सामना हा एडलेड ओव्हल येथे 21 फेब्रुवारीला होणार आहे. हे तिन्ही सामने रात्री खेळवण्यात येणार आहेत.
उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरुवात होईल. पहिला एकदिवसीय सामना हा 24 फेब्रुवारीला ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. त्यानंतर होबार्टमध्ये 27 फेब्रुवारीला दुसरा सामना पार पडणार आहे. तिसरा आणि अंतिम सामना 1 मार्चला मेलबर्नमध्ये पार पडेल. हे तिन्ही सामने डे-नाईट असणार आहेत.
वूमन्स इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक
दरम्यान टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता ही एकमेव पिंक बॉल टेस्ट मॅचने होणार आहे. पर्थमध्ये 6 ते 9 मार्च दरम्यान या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे.