मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घुले बीड कारागृहात आहे. याच कारागृहात आठवले गँगचे आरोपीही आहेत. सोमवारी सकाळी कैद्यांच्या दोन गटात राडा झाला. महादेन गिते आणि अक्षय आठवले यांनी मिळून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याची माहिती आहे. मारहाणीमागे जुने वैर होते. दरम्यान या प्रकरणानंतर अक्षय आठवले नक्की आहे तरी कोण? त्याचा आठवले गँगशी संबध काय? पाहुयात.
अक्षय आठवले नक्की कोण?
आरोपी अक्षय आठवले हा आठवले गँगचा सदस्य आहे. या टोळीवर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीमध्ये सनी आठवले, अक्षय आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद धीवार आणि ओंकार सवाई या आरोपींचा समावेश आहे.
१३ डिसेंबरला विश्वास डोंगरे यांच्यावर करून जखमी केल्याप्रकरणी त्यांच्यावर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी त्यांच्या विरूद्ध मकोकाचा प्रस्ताव २३ जानेवारीला छत्रपती संभाजीनगरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांना पाठवले होते. त्यांनी २७ जानेवारीला मान्यता दिली होती. आता या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे करीत आहेत.
कराडसोबत जुने वैर
आठवले टोळीचा म्होरक्या सनी आठवले याने सोशल मीडियात एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने वाल्मिक कराडने एका प्रकरणात आणि नंतर वाचवण्याचा बनाव केला, अशा आशयाचा उल्लेख आहे. त्यामुळे कराड आणि आठवले यांच्यात जुने वैर असल्याची माहिती आहे. हाच जुना वचपा काढण्यासाठी अक्षय आठवलेने महादेव गितेच्या मदतीने कराड आणि घुलेवर हल्ला केला असावा, अशी चर्चा सुरू आहे.