पंजाब किंग्स फ्रेंचायझीने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला असा हाणला टोला, ट्वीट करत लिहिलं की…
GH News April 02, 2025 08:09 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्स श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करत आहे. सलग दोन सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. स्पर्धेत सकारात्मक सुरुवात झाल्याने प्लेऑफच्या आशाही वाढल्या आहेत. असं असताना दुसऱ्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्याने पंजाब किंग्स फ्रेंचायझी भलतीच खूश आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 171 धावा केल्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं. 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंगने आक्रमक खेळी केली. त्याने 69 धावा केल्या तर कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 52 धावा केल्या. यासह, पंजाब किंग्सने फक्त 16.2 षटकांत 177 धावा करत 8 विकेट्सने विजय मिळवला.

या विजयानंतर पंजाब किंग्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला अप्रत्यक्षरित्या डिवचलं आहे. सोशल मीडियावर, पंजाब किंग्सने मेगा लिलावाचा उल्लेख करत लिहिलं की, आयपीएल लिलावात आमचा तणाव दूर झाला होता. खरं तर या पोस्टमधून पंतला डिवचलं असं काही दिसत नाही. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पंतने केलेलं वक्तव्य याला कारणीभूत ठरलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटींची बोली लावून संघात घेतलं. यानंतर झालेल्या एका मुलाखतीत पंत म्हणाला होता की, “आयपीएल लिलावात मला फक्त एकच टेन्शन होते.” यानंतर हसत म्हणला की, “पंजाब किंग्स.. मला भीती होती की पंजाब किंग्ज फ्रँचायझी मला खरेदी करेल.”

पंजाब किंग्सने आता लखनौ सुपरजायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करून विजय मिळवला आहे. यानंतर पंजाब किंग्सला लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला डिवचण्याची आयती संधी मिळाली. सोशल मीडियावर श्रेयस अय्यरचा व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट लिहिलं की, आयपीएल लिलावात आमचा तणाव संपला होता. लखनौ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार झाल्यानंतर ऋषभ पंतच्या विधानावर पंजाब किंग्सने ही प्रतिक्रिया दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.