Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि थायलंड या दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील अशी आसा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे थायलंडमध्ये जंगी स्वागत झाले. याच स्वागताचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदी यांचे स्वागत थायलंडचे ‘रामकियेन’ या महाकाव्यच्या सादरीकरणाने करण्यात आले.
नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर असताना पहिल्या दिवशी ते बँकॉक येथे पोहोचले. तेथे मोदी यांच्यासाठी रामायणचे थाई रुपांतर असलेला ‘रामकियेन’ या महाकाव्याचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला. रामकियेन हे थायलंडच्या संस्कृतीचा प्रभाव असलेले रामायण आहे. या रामकियेनकडे थायलंडमध्ये राष्ट्रीय महाकाव्य म्हणून पाहिले जाते.
थायलंडमधील बुंदितपाटनसिल्पा इन्स्टिट्यूटच्या (Bunditpatanasilpa Institute) संगीत आणि नाट्यविभागाच्या विद्यार्थ्यांनी रामकियेन हे नाट्य सादर केले. एकलक नु-नगोएन यांच्या मार्गदर्शनाखाली हे सादरीकरण झाले. या महाकाव्याचे सादरीकरण भारतातील भरतनाट्यम आणि थायलंडमधील खोन या दोन्ही नृत्यशैलीत सादर करण्यात आले. भारत आणि थायलंड यांच्यातील संबंधाचे प्रतिक म्हणून अशा प्रकारच्या नृत्याची रचना करण्यात आली होती. विशेष म्हणजे हा नृत्याविष्कार पाहिल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल आहेत.
थायलंड आणि भारतात रामायणाला विशेष असे महत्त्व आहे. भारतात भगवान रामाची अयोध्येचे राजकुमार म्हणून पूजा केली जाते. तर थायलंडच्या संस्कृतीत प्रभू रामाला ‘फ्रा राम’ या नावाने ओळखले जाते. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बँकॉकमध्ये त्याच्या हॉटेलमध्ये पोहोचले होते, तेव्हा थायलंडतर्फे त्यांच्या स्वागतासाठी गरबा नृत्य सादर केले होते. येथे आल्यानंतर मोदी यांनी थायलंडमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांशी संवाद साधला होता.
दरम्यान, नरेंद्र मोदी हे थायलंडच्या दौऱ्यावर असताना थायलंड सरकारने एक विशेष आयस्टॅम्प जारी केला आहे. या आयस्टॅम्पवर रामायणावर आधारलेली पेंटिंग आहे. या आयस्टॅम्पचा फोटोही मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या खात्यावर अपलोड केला आहे.