अंबड : लग्नाला अवघ्या ११ दिवसांचा अवधी असताना डोमेगाव (ता. अंबड) येथील तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. तीन) रात्री समोर आली.
राम पांडुरंग धाईत (वय २७) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याचे बीएपर्यंत शिक्षण झाले. मंठा तालुक्यातील तळणी येथील मुलीशी मंगळवारी (ता. १५) त्याचा विवाह होणार होता. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू होती.
जालन्यात कालच लग्नाचा बस्ता बांधला होता. बस्ता बांधल्यानंतर राम व त्याचे नातेवाईक सायंकाळी डोमेगावला आले. घरात कोणाला काहीही न बोलता राम शेतात गेला. त्याच्या भावाने अनेकदा मोबाइलवर संपर्क साधला.
मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी शोध सुरू केला. त्यावेळी शेतातील झाडाला रामने दोरीने गळफास घेकल्याचे रात्री साडेसातच्या सुमारास आढळले. त्याला अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.