CSK vs DC Toss : दिल्लीचा उपकर्णधार आऊट, चेन्नईच्या गोटात घातक फलंदाजासह दोघांचा समावेश
GH News April 05, 2025 06:08 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे चेन्नईच्या घरच्या मैदानात अर्थात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार अक्षर पटेल याने चेन्नईविरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा हा तिसरा तर चेन्नईचा चौथा सामना आहे. दिल्लीने दोन्ही सामने जिंकलेत. त्यामुळे दिल्लीकडे चेन्नईवर मात करत विजयी हॅटट्रिक साजरी करण्याची संधी आहे. तर चेन्नईने विजयी सुरुवातीनंतर सलग दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे चेन्नईसमोर दिल्लीविरुद्ध विजय मिळवण्यासह पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचं आव्हान आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

चेन्नई आणि दिल्ली दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. दिल्लीचा उपकर्णधार फाफ डु प्लेसीस सामन्यासाठी फिट नसल्याने त्याच्या जागी समीर रिझवी याला संधी देण्यात आली आहे, अशी माहिती कर्णधार अक्षर पटेल याने दिली. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईने 2 बदल केले आहेत. जेमी ओव्हरटन याच्या जागी ओपनर डेव्हॉन कॉनव्हे याला संधी देण्यात आली आहे. तर राहुल त्रिपाठीच्या जागी मुकेश चौधरीचा समावेश करण्यात आला आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (विकेटकीपर), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, अक्षर पटेल (कॅप्टन), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि मोहित शर्मा.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, डेव्हॉन कॉनव्हे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), आर अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद आणि मथीशा पाथिराना.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.