मल्टीबॅगर शेअर मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून घसरण सुरु आहे. या घसरणीमागं अनेक कारणं आहेत. या पैकी प्रमुख कारणांचा विचार केला असता विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून करण्यात येत असलेली त्यांच्या समभागांची विक्री, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सुरु करण्यात आलेलं टॅरिफ ट्रेड वॉर, भारतीय कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील कमजोर कामगिरीचे अहवाल यामुळं भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स सप्टेंबर 2024 मध्ये उच्चांकावर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात तेजी आणि मंदीचं चित्र असलं तरी काही कंपन्यांच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न दिले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील एका कंपनीनं गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना 3200 टक्के रिटर्न दिला आहे. या कंपनीचा शेअर पाच वर्षांपूर्वी 5 रुपयांवर होता तो आता 182 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरमध्ये एका वर्षात 40 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. तर, गेल्या दोन वर्षात या कंपनीचा शेअर 921 टक्के वाढला आहे. या कंपनीचं नाव एसपीएमएल इन्फ्रा असं आहे. या कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. या कंपनीकडे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील 43 टक्के अनुभव आहे. कंपनीची स्थापना 1981 मध्ये गुवाहाटीमध्ये एक वॉटर पंप एजन्सी म्हणून झाली होती. ऑगस्ट 1983 मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी झाली होती.
एसपीएमएल इन्फ्रा कंपनीचा शेअर बीएसईवर 4 एप्रिलला 182.35 रुपयांवर बंद झाला. गुंतवणूकदारांना या स्टॉकनं गेल्या पाच वर्षात 3221.49 टक्के परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारानं या कंपनीचे 20000 रुपयांचे स्टॉक खरेदी केले असतील त्याची किंमत आज 6 लाख रुपयांपेक्षा अधिक झाली असेल. तर, ज्यानं पाच वर्षांपूर्वी 50 हजार रुपयांचे शेअर घेतले असतील त्याचे 16 लाख आणि ज्यानं 1 लाख रुपयांचे शेअर घेतले असतील त्याचे 33 लाख रुपये झाले असतील.
बीएसईवरील आकडेवारीनुसार कंपनीचं बाजारमूल्य 1300 कोटी रुपये आहे. एका आठवड्यात या स्टॉकमध्ये 15 टक्के तेजी आली आहे. कंपनीत मार्च 2025 पर्यंत प्रमोटर्सची भागिदारी 35.21 टक्के होती. कंपनीनं 2011 मध्ये 50 पैसे प्रति शेअर याप्रमाणं लाभांश दिला होता. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 306 रुपये तर 52 आठवड्यांचा निचांक 112.70 रुपये आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर 2024 च्या तिमाहीत एसपीएमएल इन्फ्राचा स्टँडअलोन बेसिसवर महसूल 186.7 कोटी इतका राहिला आहे. कंपनीचा निव्वळ नफा 10 कोटी इतका आहे. तर, प्रति शेअर कमाई 1.26 कोटी राहिली. कंपनीनंचा 2024 या आर्थक वर्षात स्टँड अलोन बेसिस वर महसूल 1318. 38 कोटी रुपये होता. तर, निव्वळ नफा 19.52 कोटी रुपये होता. तर, प्रति शेअर कमाई 3.98 कोटी रुपये इतकी होती.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..