Chief Minister Fellowship Program 2025-26 announced in maharashtra
Marathi April 05, 2025 08:24 PM


मुंबई : राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26” जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात 60 फेलोंची निवड करण्यात येणार आहे. (Chief Minister Fellowship Program 2025-26 announced in maharashtra)

फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला व यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर 2023-24 या कालावधीतील कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्या नंतर आता 2025-26 साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत केली जाईल.

फेलोंच्या निवडीकरता अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच तो कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 60 टक्के गुण आवश्यक) असावा. याशिवाय अर्जदाराचा किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटीसशिप/आर्टीकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल. तसेच अर्जदाराला मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

हेही वाचा – Sanjay Raut : माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा, राऊतांचा खोचक टोला

महत्त्वाचे म्हणजे उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान 21 वर्षे व कमाल 26 वर्षे असावे. याशिवाय अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रणालिद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे. यासाठी उमेदवाराकडून अर्जाकरिता 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या कार्यक्रमात फेलोंची संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या 1/3 राहणार आहे. जर एखाद्या वेळेस 1/3 महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

निवड प्रक्रिया कशी असणार?

फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाइन अर्ज करून ऑनलाइन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाइन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा Online (Objective Test) द्यावी लागेल. ऑनलाइन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या सुमारे 210 उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहीत तारखेस विहीत वेळेत ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागेल. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 210 उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.

हेही वाचा – Uday Samant : मराठीबाबत आमची एकच भूमिका, राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांनी केले स्पष्ट

निवड झालेल्या फेलोंना दरमहा 61,500 मानधन मिळणार

निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक 20 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांच्या अधिनस्त काम पाहतील. फेलोंची नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजु झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये 56,100 व प्रवासखर्च रुपये 5,400 असे एकत्रित रुपये 61,500 छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.