शनिवारी (५ एप्रिल) राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला आयपीएल २०२५ स्पर्धेत ५० धावांनी पराभवाचा धक्का दिला. हा राजस्थान रॉयल्सचा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय ठरला. या विजयात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला. या सामन्यात जोफ्रा आर्चरच्या झोपेचीही चांगलीच चर्चा रंगली.
झाले असे की या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरले. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात करताना पहिल्या १० षटकात विकेट जाऊ दिली नव्हती.
संजू सॅमसन बाद झाल्यानंतरही बाकी फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे यावेळी जोफ्रा आर्चरने मात्र या वेळात झोप घेतली. राजस्थान रॉयल्सची फलंदाजी सुरू असताना जोफ्रा आर्चर गुलाबी रंगाचा टॉवेल अंगावर घेऊन ड्रेसिंग रुममध्ये झोपल्याचे दिसत होते. त्याचा हा फोटोही व्हायरल झाला.
तथापि, जशी राजस्थानचा डाव संपत आल, तसा जोफ्रा पूर्ण तयार होऊन जर फलंदाजी आलीच तर त्यासाठी पॅड वैगरे बांधून तयार झाला होता. पण त्याच्यापर्यंत फलंदाजी आली नाही. नंतर गोलंदाजी करताना मात्र त्याच्यातील जोश दिसून आला.
या हंगामाची सुरुवात एकाच सामन्यात सर्वात धावा देणारा गोलंदाज ठरण्यापासून केलेल्या जोफ्रा आर्चरने पंजाब किंग्सविरुद्ध मात्र त्याची प्रतिभा दाखवली. त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर पंजाबचा सलामीवीर प्रियांश आर्यला त्रिफळाचीत केले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने आर्चरला दोन चौकारही मारले.
पण आर्चरने पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तुफान फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरलाही त्रिफळाचीत केले. पहिल्याच षटकात बसलेल्या दोन मोठ्या धक्क्यांनंतर पंजाब किंग्स सावरू शकला नाही आणि त्यांनी धीम्या गतीने धावा करण्यासोबतच नियमित कालांतराने विकेट्सही गमावल्या.
शेवटच्या षटकातही आर्चरने अर्शदीप सिंगला बाद करत एकूण ३ विकेट्स या सामन्यात घेतल्या. त्याने या ३ विकेट्स घेताना ४ षटकात २५ धावाच दिल्या. त्याला संदीप शर्माकडूनही चांगली साथ मिळाली. संदीपनेही २ विकेट्स घेतल्या. तसेच राजस्थानकडून महिश तिक्षणानेही २ विकेट्स घेतल्या.
पंजाब किंग्सला २० षटकात ९ बाद १५५ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून नेहल वढेराने ४१ चेंडूत ६२ धावांची खेळी केली, तर ग्लेन मॅक्सवेलने ३० धावांची खेळी केली. बाकी कोणी खास काही करू शकले नाहीत.
तत्पुर्वी, राजस्थान रॉयल्सने २० षटकात ४ बाद २०५ धावा केल्या. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने ४५ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. रियान परागने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनने २६ चेंडूत ३८ धावा केल्या.
तसेच शिमरॉन हेटमायरने १२ चेंडूत २० आणि ध्रुव जुरेलने ५ चेंडूत नाबाद १३ धावांचे योगदान दिले. पंजाब किंग्सकडून गोलंदाजी करताना लॉकी फर्ग्युसनने २ विकेट्स घेतल्या.