सनराजर्स हैदराबादला 6 एप्रिलला पुन्हा एकदा घरच्या मैदानात पराभूत व्हावं लागलं. गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. मोहम्मद सिराज हा गुजरात टायटन्सच्या विजयाचा नायक ठरला. सिराजने 4 ओव्हरमध्ये 17 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. सिराजला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. सिराजने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. सिराजने या दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड न होण्यावरूनही प्रतिक्रिया दिली. सिराज काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.
“चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड न होणं हे पचवणं सोपं नव्हतं. मी खूप दु:खी झालो होतो. मात्र मी त्यानंतर स्वत:ला सावरलं. अजून खूप काही करायचं आहे, असं मी स्वत:ची समजूत घातली. मी माझ्या फिटनेसवर आणि मानसिकतेवर काम करायला सुरुवात केली”, असं सिराजने म्हटलं.
“टीम इंडियात जेव्हा निवड होत नाही तेव्हा लक्ष केंद्रीत करणं अवघड होतं. मात्र मी स्वत:ला सावरलं आणि आयपीएलच्या तयारीला लागलो”, असं सिराजने सांगितलं.
तसेच सिराजने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आतापर्यंतच्या यशाबाबतही प्रतिक्रिया दिली. “जेव्हा सर्व काही आपण ठरवल्यासारखं घडतं तेव्हा टॉपवर येतो. माझ्या सोबतही तसंच होत आहे”, असंही सिराज म्हणाला.
दरम्यान मोहम्मद सिराजने कुटुंबियांसमोर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी केली. सिराजने हैदराबादविरुद्ध 17 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. विशेष आणि उल्लेखनीय बाब अशी की सिराजने ही कामगिरी घरच्या मैदानात केली.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंडू मेंडीस, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद शमी.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुधारसन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.