IPL 2025: वानखेडेवर RCB चे धुरंधर चमकले! विराट, पाटिदार यांनी मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धुतले...; दोनशेपार धावांचा डोंगर
esakal April 08, 2025 05:45 AM

सोमवारी (७ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील २० वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स संघात खेळवला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. या सामन्यात बंगळुरूने मुंबईसमोर २२२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बंगळुरू संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले.

बंगळुरूकडून फिल सॉल्ट आणि यांनी डावाची सुरुवात केली. पण नेहमीप्रमाणे ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात विकेट घेतली. त्याने फिल सॉल्टला दुसऱ्याच चेंडूवर ४ धावांवर असताना त्रिफळाचीत केले. पण त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी मुंबईच्या गोलंदाजांना चांगलाच संघर्ष करायला लावला. त्यांनी ९१ धावांची भागीदारी केली.

ही भागीदारी धोकादायक ठरत होती, कारण जवळपास १० च्या धावगतीने त्यांनी धावा जोडल्या होत्या. अखेर ९ व्या षटकात विघ्नेश पुथुरने पडिक्कलला ३७ धावांवर विल जॅक्सनच्या हातून झेलबाद केले.

पण, त्यानंतरही विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटिदारने लय गमावली नाही. त्यांनी आक्रमक फलंदाजी केली. विराटने त्याचे अर्धशतक करण्यासोबतच १३ हजार टी२० धावाही पूर्ण केल्या. तो असा पराक्रम पहिला भारतीय ठरला. त्याच्यात आणि पटिदार यांच्यातही अर्धशतकी भागीदारी झाली.

पण १५ षटकात मुंबईचा कर्णधारच संघाच्या मदतीला धावला. विराटला आधी बाद केले. विराटचा झेल नमन धीरने घेतला. विराटने ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावांची खेळी केली. याच षटकात हार्दिकने धोकदायक ठरू शकणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनलाही शून्यावरच माघारी धाडले.

तरी रजत पाटिदार खेळपट्टीवर होता. त्याला जितेश शर्माने तोलामोलाची साथ दिली. १७ व्या षटकात या दोघांनी तब्बल २३ धावा वसूल केल्या. १९ व्या षटकातही त्यांनी आक्रमक खेळ केला. पण या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाटिदारला अखेर बोल्टने बाद केले. पाटिदारने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावा केल्या.

या फटकेबाजीमुळे २० षटकात बंगळुरूने ५ बाद २२१ धावा केल्या. बंगळुरूकडून जितेश शर्म १९ चेंडूत ४० धावांवर नाबाद राहिला. तसेच टीम डेव्हिड १ धावेवर नाबाद राहिला.

मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. विघ्नेश पुथूरने १ विकेट घेतली. जसप्रीत बुमराहने या सामन्यातून पुनरागमन केले. पण त्याला विकेट घेता आली नाही. मात्र त्याने मुंबई इंडियन्सकडून त्याने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २९ धावाच खर्च केल्या.

मुंबई इंडियन्ससाठी स्पेशल सामना

हा सामना मुंबई इंडियन्ससाठी खास आहे कारण त्यांचा हा टी२० क्रिकेटमधील २८८ वा सामना आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आता सर्वाधिक टी२० सामने खेळणारा संघ ठरला आहे. त्यांनी सोमरसेटच्या २८७ टी२० सामन्यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.