येरमाळा - येथील आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीचा चैत्र पोर्णिमा यात्रोत्सव १२ ते १७ एप्रिल दरम्यान होतं आहे. चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम रविवारी (ता. १३) होणार आहे. देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीने कार्यक्रम पत्रिका प्रकाशित केली असुन मंदिर देवस्थान ट्रस्टकडून यात्रा पूर्व तयारी कामे जोमात सुरु आहेत.
तुळजाभवानीमातेची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीची ओळख आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा यात्रोत्सव म्हणून येरमाळा राज्यात परिचित आहे. देवीच्या मंदिरात शनिवारी (ता.१२) महापूजा,रात्री दहाला छबिना होणार आहे. १३ एप्रिलला सकाळी आठला देवीच्या पालखीचे आमराई मंदिराकडे प्रस्थान होईल.
देवीची पालखीचे वाजत गाजत चुन्याच्या रानात आगमन झाल्यानंतर सकाळी दहाला चुना वेचण्याचा कार्यक्रम होईल. चुन्याच्या रानातून देवीची पालखी आमराई मंदिरात पुढे चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी पाच दिवस पालखीचा मुक्काम असेल.
सोमवारी १४ एप्रिलला पशुप्रदर्शन तर मंगळवारी १५ एप्रिलला दुपारी चारला कुस्त्यांची स्पर्धा, तर रात्री नऊला आराधी गायनाचा आराधी मेळा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी १६ एप्रिलला रात्री ९ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून शोभेच्या दारुची मिरवणूक निघून आमराई मंदिर परिसरात आतषबाजीचा कार्यक्रम होणार आहे.
१७ एप्रिलला दुपारी चारला पालखीच्या महापूजेनंतर घुगरी महाप्रसादाचे वाटप झाल्या नंतर डोंगरावरील श्री येडेश्वरी देवीच्या मुख्य मंदिराकडे पालखीचे वाजतगाजत प्रयाण होणार आहे.
देवस्थान ट्रस्ट कडून यात्रेची तयारी
शनिवार १२ तारखेपासून श्री देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात होणार असून देवस्थान ट्रस्ट कडून, भाविकांच्या दर्शनासाठी, मंदिर परिसर, सभा मंडप, दर्शन रांग, डोंगरा भोवतीचा फेटा मार्ग, आमराई मंदिर परिसरातील, घुगरी महाप्रसाद वाटप कट्टा साफसफाईची कामे सुरू आहेत.
चुना वेचण्याची परंपरा; पंधरा लाख भाविकांची असते उपस्थिती
श्री येडेश्वरी देवीच्या वर्षातून दोन यात्रा भरतात.एक नारळी पौर्णिमेला आणि दुसरी चैत्र पौर्णिमेला. चैत्र पौर्णिमा यात्रेतील चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रमाला वेगळे महत्व असुन राज्यासह अन्य राज्यातूनही पंधरा लाखाच्या वर भाविक दाखल होतात.
देवीची पालखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अमराई मंदिराकडे मिरवत येत असताना पालखी चुण्याचा रानात येताच चुना वेचण्याची प्रथा पुर्वापार चालत आलेली आहे. चुण्याचे पाच खडे वेचून चुनाखडी आणि नेवैद्य पालखीवर टाकण्यासाठी भाविकांची गर्दी होते.