Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Marathi Update: विराट कोहली व रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतर रोहित शर्माकडून प्रत्युत्तर पाहायला मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरली. रोहितने २ चौकार व १ षटकार खेचून आशा जागवल्या, परंतु यश दयालच्या अनपेक्षित चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला. वानखेडेवर अचानक स्मशानशांतता पसरली.
विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांच्या ९१ धावांच्या भागीदारीने बंगळुरूचा पाया मजबूत केला. पडिक्कल २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावांवर बाद झाला. विराटने आजच्या सामन्यात ट्वेंटी-२०त क्रिकेटमधील १३००० धावांचा टप्पा ओलांडला.त्याच्या आक्रमक खेळीला हार्दिक पांड्याने ब्रेक लावला. विराट ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६७ धावांवर बाद झाला. कर्णधार रजत पाटीदारने मोर्चा सांभाळताना ३२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांची खेळी केली. जितेश शर्मानेही १९ चेंडूंत नाबाद ४० धावा कुटताना संघाला ५ बाद २२१ धावांवर पोहोचवले.
हार्दिकने दोन विकेट्स घेताना ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा गाठला. ट्वेंटी-२०त ५००० धावा व २०० विकेट्स अशी दुहेरी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. ट्रेंट बोल्टनेही दोन विकेट्स घेतल्या. पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहची विकेटची पाटी कोरी राहिली.
प्रत्यु्त्तरात दुसऱ्याच षटकात रोहित बाद झाला. यशच्या इनस्वींग चेंडूने रोहितची दांडी उडवली. तो ९ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह १७ धावांवर बाद झाला. जोश हेझलवूडने चौथ्या षटकात रायन रिकेल्टनला ( १७) पायचीत पकडून मुंबईला ३८ धावांवर दोन धक्के दिले.
रोहित शर्माला आयपीएलच्या मागील ११ डावांत १४.३६च्या सरासरीने १५८ धावा करता आल्या आहेत. या ११ इनिंग्जमध्ये त्याने केवळ एकदाच २० हून अधइक धावा केल्या आहेत. रोहितने आयपीएलमध्ये एकूण २६१ सामन्यांत ६६६६ धावा केल्या आहेत.