होरपळ आणि तळमळ
esakal April 10, 2025 10:45 AM

मृण्मयी देशपांडे - अभिनेत्री

पाच वर्षांपूर्वी, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी, आम्ही महाबळेश्वरला राहायला गेलो. डिसेंबर महिना होता.. थंडी एवढी प्रचंड होती, की संध्याकाळनंतर एखादी गोष्ट बाहेर राहिली असेल, तर कोणी जाऊन आत आणायची यावरून माझी आणि स्वप्नीलची भांडणं व्हायची. आमच्या शेतापासून दीड ते दोन किलोमीटर दूर ‘घावरी’ नावाचं गाव. तिकडे आम्ही एका शेतामध्येच एक छोटंसं घर भाड्याने घेतलं होतं. घराच्या आजूबाजूला जंगल होतं आणि घराच्या अगदी समोर एक प्रचंड मोठं, डेरेदार हिरड्याचं झाड होतं. त्यावर ‘पॅराडाइज प्लाय कॅचर’चं (पांढऱ्या रंगाचा अत्यंत सुंदर आणि दुर्मीळ पक्षी) घर होतं. शहरामध्ये राहून गावातल्या हवेबद्दलच्या माणसांबद्दलच्या गोष्टी आपण नुसते ऐकतो...आम्ही त्या बघत होतो! अनुभवत होतो!

पहिल्या वर्षी आम्ही थंडी पाहिली, शेतात आलेले गवे पाहिले, जिवंत अन्न खाल्लं, गावच्या जत्रा पाहिल्या, गावातली भांडणं पाहिली, काही अनुभवली. बदलणारे ऋतू पाहिले आणि वन वणवेसुद्धा पाहिले..

जिथं उष्णतेची तीव्रता प्रचंड असते आणि आजूबाजूची जागा कोरडी असते, तिथे नैसर्गिकरित्या वन वणवे लागू शकतात; पण महाबळेश्वर मुळातच सदाहरित जंगल आहे. इथं नैसर्गिकरित्या वणवा लागणं जवळजवळ अशक्य आहे. या भागातले सर्व वणवे हे मानवनिर्मित किंवा आपल्या निष्काळजीपणामुळे लागलेले असतात. मार्च आणि एप्रिलमध्ये डोंगरच्या डोंगर जळताना दिसतात. यामध्ये वाळलेलं गवत जाळलं, की नवीन येणारं गवत लवकर आणि जास्त चांगल्या प्रतीचं येतं हा शेतकऱ्यांचा समजसुद्धा कारणीभूत आहेच. आमच्या शेतापर्यंत आलेल्या वणव्याचं कारणसुद्धा निश्चितपणे मानवनिर्मित होतं.

शेताला आणि घराला काही झालं नाहीये हे ऐकून, अनुयाच्या घराबाहेरच पायरीवर बसून, मी कितीतरी वेळ रडत होते. ‘‘अगं ए! इकडे बसून काय करतीयेस?’’ अनुयाने नेहमीप्रमाणे तिच्या जोरदार आवाजात मला विचारलं. ती माझ्या मागे येऊन कधी उभी राहिली होती, मला कळलंच नव्हतं. माझा चेहरा बघून तिला कळलं काहीतरी बिनसलं आहे. अर्थातच मला घरी घेऊन गेली, पाणी प्यायला लावलं, आणि पुढचा अर्धा तास मला एकही प्रश्न न विचारता तिनं मला रडू दिलं. मी शांत झाल्यावर तिनं काय झालं आहे विचारलं. मी घडलेला सगळा प्रसंग सांगितला. ती म्हणाली, ‘‘अगं वेडे, शेताला काही नाही झालंय, घराला काही नाही झालंय, मग का एवढी रडते आहेस?’’ मी म्हणाले, ‘‘म्हणूनच रडून घेते आहे.. तिकडे काही झालं असतं तर रडायला वेळच मिळाला नसता मला..’’

अनुया अशी पोटापासून प्रेम करणाऱ्या लोकांपैकी एक आहे. मुंबईमध्ये कधीही कोणतीही अडचण आली, एकटं एकटं वाटलं.. किंवा अगदी शुल्लक फुटकळ गोष्ट हवी असेल, माझा पहिला फोन अनुयाला जातो. कित्येकदा त्यांच्या कुटुंबापैकी कोणीही घरी नसताना आम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तिकडे जेवून जात असतो. मुंबईमधलं माझं दुसरं घर आहे ते. मी तिच्या घरी असल्यामुळे अर्थातच घडलेल्या घटनेचा भार कमी झाला होता आणि अर्थातच पूर्ण शांत झाल्याशिवाय आणि जेवल्याशिवाय घरी जायला मुभा नव्हती.

मी जेव्हापासून शेतावर घडलेल्या या प्रसंगाबद्दल लिहीत आहे, तेव्हापासून अनेक आप्तेष्टांचे, शेतावर वर्कशॉप करून गेलेल्या अनेक मित्र-मैत्रिणींचे फोन येऊन गेले. अत्यंत काळजीनं विचारपूस केली. गरज असल्यास येऊन राहण्याची तयारीसुद्धा दाखवली. या लेखांमुळे एक गोष्ट नक्की कळाली, की आम्ही एकटे नाही आहोत. या प्रवासात अनेक लोक प्रेमाने जोडलं गेलेत.. आणि याबद्दल त्या प्रत्येकाचे आभार मानावेत तितके कमी आहेत; पण आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे - आज माझ्या बाबतीत काही घडलं, तर ते मांडण्यासाठी या सदरासारखं माध्यम आहे, सोशल मीडियावर लिहिता येतं. मला माझं छोटं दुःखसुद्धा शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करता येतं; पण या वणव्यामध्ये जी झाडं, प्राणी- पक्षी होरपळतात.. त्यांचा वर्षानुवर्षीचा हॅबिटॅट एका क्षणात नाहीसा होतो. ज्यांची घरं बांधून द्यायला कोणी गवंडी नसतात, आणि त्यांचं घर आगीत जळलं किंवा त्यांच्यापैकी कोणी होरपळून गेलं, तर त्यांच्या नावावर कोणता इन्शुरन्सही नसतो. त्यांनी नक्की काय करायचं? कुठे जायचं? कोणत्या माध्यमाकडे धाव घ्यायची आणि कोणत्या सोशल मीडियावर फोटो टाकायचे?

मनुष्य प्राणीच आहे.. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत का? (अर्थात एखाद्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ हा विचारसुद्धा मानवनिर्मित किंवा मानवांपुरताच आहे. निसर्गाच्या दरबारात जेवढा हत्ती महत्त्वाचा, तेवढीच लागलेली बुरशीसुद्धा!) आपण क्षणभर समजून चालू, की आपण श्रेष्ठ आहोत. मग जेव्हा एखाद्याला कळतं, की आपण इतरांपेक्षा वरच्या पातळीवर आहोत, तेव्हा उन्माद वाढला पाहिजे, की जबाबदारीची जाणीव? मानवाला बुद्धीबरोबर संवेदना का दिल्या आहेत? तर आपण त्याचा योग्य वापर करू शकतो म्हणून! आपण त्या बुद्धीचं नक्की काय करतो आहोत? ज्यांना हे प्रश्नच पडत नाहीत, त्यांना ते पडले पाहिजेत आणि ज्यांना हे प्रश्न पडतात, त्यांनी ते सोडवायला मातीमध्ये उतरलं पाहिजे.

जाता जाता अजून एक सांगते, त्या घावरीच्या घरासमोर असलेलं हिरड्याचं डेरेदार झाड आज नाही. आजूबाजूची अनेक झाडंही नाहीशी झाली.. मानवनिर्मित यंत्रानं तिकडे एका रात्रीत आपली जादू दाखवली.. निसर्गाला जे बनवायला लाखो वर्षं लागली ते एका सेकंदामध्ये ‘साफ’ केलं गेलं..

‘पॅराडाईज प्लाय कॅचर’ही आता दिसत नाही... आणि हल्ली तिकडे आधीसारखी थंडी पडत नाही!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.