नागपूर : सीताबर्डीतील चप्पलांच्या दुकानासमोरील फूटपाथच्या दुकानावरून झालेल्या वादात धारदार शस्त्राने वार करीत खून करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तसेच पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद केले. कय्युम अब्दुल बशीर (वय ३३), जहीर अब्दुल बशीर (वय ३७, दोघेही रा. लोधीपुरा लाल, बजेरिया शाळेजवळ, नागपूर) अशी त्यांची नावे आहेत.
सिराज अब्दुल बशीर (वय ४३) या तिसऱ्या आरोपी भावाला न्यायालयाने पुराव्याअभ्यावी निर्दोष ठरविले. तिघांवर सीताबर्डी पोलिस ठाण्यात जावेद ऊर्फ अब्दुल अजीज अन्सारी (वय २६, रा. जाफरनगर) याच्या खुनाच्या आरोपात गुन्हा दाखल होता. ही घटना १२ जून २००९ रोजी सीताबर्डीतील रिजंट टॉकीजसमोर घडली.
घटनेच्या दिवशी जावेद त्याचा मित्र जहरूद्दीन ऊर्फ कमरूद्दीनसोबत चप्पलच्या दुकानासमोर गेला. दुकानासमोरील फुटपाथवरून जहरूद्दीन आणि कय्युम बशीर यांचा जुना वाद होता. याच वादाच्या रागात आरोपींनी जावेदवर धारदार शस्त्राने वार केले.
पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये भरती केले; पण डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. सर्व बाजू आणि साक्ष लक्षात घेत न्यायालयाने दोघा भावांना जन्मठेप तर तिसऱ्या भावाची निर्दोष मुक्तता केली. राज्य शासनातर्फे ॲड. आसावरी पळसोदकर यांनी बाजू मांडली.