पुण्यातील भोर तालुक्यात चार गावांतून पाण्याच्या टँकरची मागणी
Marathi April 17, 2025 12:26 PM

या वर्षी पुरेसा पाऊस होऊनही भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वारवंड, शिळीम, तर पुणे-सातारा महामार्गालगत करंदी खेडेबारे, साळवडे या गावांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या चारही ग्रामपंचायतींनी पाण्याच्या टँकरची मागणी केली असून, यातील साळवडे व करंदी खेडेबारे या गावांना पाण्याच्या टँकरची मंजुरी मिळाली आहे, तर पाण्याच्या टैंकरबाबत वारवंड व शिळीम या दोन गावांची पाहणी होणार आहे, अशी माहिती भोर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

करंदी खेडेबारेमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत नसल्यामुळे आणि ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणी योजनेचे काम रखडल्यामुळे काही वर्षांपासून लोकांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी पाण्यासाठी स्थानिकांमध्ये वाद, तंटे, भांडणे झाल्याचे पाहायला मिळते. पाण्यासाठी महिला-पुरुषांना तीन किलोमीटर पायपीट करावी लागते.

पुणे-सातारा महामार्गावरील करंदी खेडेबारे येथील जलस्रोत आटल्यामुळे मागील महिन्यापासून गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणी योजनेच्या विहिरीतील पाणी आटले. त्यामुळे नळाचे पाणी बंद झाले. सध्या गावचे सरपंच नवनाथ गायकवाड यांनी एका उद्योजकाच्या मदतीने टँकर सुरू केला आहे. तसेच स्थानिक नेते कुलदीप कोंडे यांच्यामार्फत पाण्यासाठी टँकर येत आहे.

‘जलजीवन’ योजनेअंतर्गत दोन कोटी रुपये मंजूर झाले; परंतु गावामध्ये नैसर्गिक पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्यामुळे जवळच्या दिवडी गावातील तलावातून पाणी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्यामुळे पुढील काम रखडले आहे. त्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत, असे करंदी खेडेबारेचे सरपंच नवनाथ गायकवाड यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.