पुढील महिन्यापर्यंत निवडणूक लांबण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण असेल या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास आणखी विलंब होऊ शकतो. दोन राज्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक रखडल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. यावर्षी जानेवारीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार होती, परंतु सद्यस्थितीत एप्रिल महिना अर्धा उलटून गेला तरी निवडणूक झालेली नाही.
गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांची निवड न झाल्यामुळे अध्यक्षांची निवडणूक रखडली आहे. पक्षात नवीन अध्यक्ष निवडला जात असताना केंद्र सरकार आणि पक्ष संघटनेत मोठे बदल अपेक्षित आहेत. पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या संसदीय मंडळात शक्तिशाली नेत्यांना स्थान दिले जाऊ शकते.
नवीन अध्यक्षांच्या निवडीबाबत अद्याप एकमत झालेले नाही. भाजपला संघटना मजबूत करायची असून ती जबाबदारी सांभाळू शकेल असा नेता राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचा आहे. अध्यक्ष निवडीमध्ये राजकीय/जातीय/प्रादेशिक संतुलन साधण्यासोबतच संघटना मजबूत करणाऱ्या नेत्याला प्राधान्य देण्याचा विचार केला जात आहे. नवीन अध्यक्षांच्या टीममध्ये सरचिटणीस म्हणून तरुण नेत्यांना स्थान दिले जाण्याचे संकेत मिळत आहेत.
अण्णाद्रमुकला सरकारमध्ये स्थान शक्य
दुसरीकडे, बिहार निवडणुकीपूर्वी मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अलिकडेच एनडीएचा भाग झालेल्या एआयएडीएमकेलाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चाही दिल्ली दरबारी सुरू आहे. गेल्या आठवड्यात अमित शहा यांच्या उपस्थितीत तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक-भाजप युतीची घोषणा करण्यात आली होती.