सायली शिंदे - योगतज्ज्ञ
संधिवातामुळे महिलांना हात, पाय, गुडघे, मणका आणि कंबर यामध्ये वेदना, सूज, स्टिफनेस आणि हालचालींमध्ये मर्यादा येते. अशा वेळी योग्य योगासनांचा सराव केल्यास सांध्यांना लवचिकता मिळते, रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज-ताठरपणा कमी होतो.
उत्तानपादासन (पाय वर घेण्याचे आसन) : पाठीवर झोपा, दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. श्वास घेत दोन्ही पाय हळुवारपणे ३० ते ४५ अंशांनी वर उचला. काही सेकंद पाय स्थिर ठेवा. नंतर श्वास सोडत हळूहळू पाय जमिनीवर आणा. फायदे : पायातील सूज कमी होते, गुडघ्यांवरील ताण कमी होतो.
अर्धा कटिचक्रासन (कमरेपासून वळण्याचे आसन) : ताडासनमध्ये उभे राहा. डाव्या हाताला कमरेवर ठेवा, उजवा हात पुढे आणा. श्वास घेत उजवीकडे कंबरेपासून सावकाश वळा, दृष्टी मागे नेण्याचा प्रयत्न करा. नंतर श्वास सोडत पुन्हा सरळ स्थितीत या. दुसऱ्या बाजूनेही करा. फायदे : कमरेचा स्टिफनेस कमी होतो, पाठीचा कणा लवचिक होतो, सांध्यांना बळकटी मिळते.
अर्धा उष्ट्रासन (उंटासानाचा हलका प्रकार) : वज्रासनातून उभे व्हा. दोन्ही हात कमरेवर ठेवा. श्वास घेत हळूहळू मागे झुकून मान व छाती मागे झुकवा. नंतर श्वास सोडत हळूहळू पुन्हा सरळ स्थितीत या. फायदे : छाती, पाठ आणि कंबर बळकट होते. मणक्यांमध्ये लवचिकता वाढते, संधिवातामुळे येणारा अकारण थकवा कमी होतो.
सेतूबंधासन (ब्रिज पोज) : पाठीवर झोपा, गुडघे वाकवा, पाय जमिनीवर ठेवा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. श्वास घेत हळुवारपणे कंबरेपासून शरीर वर उचला, छाती वर घ्या. नंतर श्वास सोडत शरीर पुन्हा खाली आणा. फायदे : पाठदुखी व कंबरदुखी कमी होते. मणक्यांना बळकटी मिळते, सांध्यांची लवचिकता वाढते.
सुखासनात बसा. उजव्या हाताने नासिकामुद्रा करा. एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्या, मग बदलून श्वास सोडा. हाच क्रम काही मिनिटे करा.फायदे : संधिवातामुळे होणारा मानसिक तणाव कमी होतो. शरीरातील सूज व स्टिफनेस नियंत्रित होतो. प्राणशक्ती वाढते, संपूर्ण शरीर हलके वाटते.
टीप : संधिवातात कोणतेही आसन झपाट्याने किंवा जोरात करू नये. शरीराला जसे जमते, तसे हळूहळू करत राहिल्यास उत्तम परिणाम दिसू लागतात.
दिनचर्या व आहार
सकाळी : हळद-मेथी पाणी, योग ३० मिनिटे.
नाश्ता : रागी डोसा, बदाम.
दुपारी : भाज्या, डाळ, पोळी, ताक.
संध्याकाळी : आले-हळद चहा, फळे.
रात्री : हलके जेवण, झोपेपूर्वी हळदीचे दूध.
टीप : रोज कमीत कमी ३० मिनिटे योगासने करा. तळलेले, साखर व मैद्याचे पदार्थ टाळा.
संधिवात हा आजार नाही तर आव्हान आहे- योग्य मार्गाने चालल्यास तुम्ही त्यावर सहज मात करू शकता.