आयुष्याच्या परीक्षेतला एक 'धडा'
esakal April 17, 2025 01:45 PM

जुई गडकरी - अभिनेत्री

आपल्या आयुष्यात अशा काही तारखा असतात ज्या आठवल्या, की कधी त्रास होतो, तर कधी गंमत वाटते. ११ मे २००४ ही माझ्या आयुष्यातली अशीच एक तारीख.

तो दिवस आठवला की आजही मजा येते. माझा अकरावीचा कॉमर्सच्या वार्षिक परीक्षेचा रिझल्ट त्या दिवशी लागला होता. मला खूप जास्त भीती वाटत होती. कशीबशी १०.५३ च्या लोकलनं कॉलेजला पोहोचले. निकाल ज्या बोर्डावर चिकटवले होते, तिथं खूप मुलांनी खूपच गराडा घातला होता. मी कशीबशी धीर एकवटून त्या गराड्यात शिरले आणि माझा रोल नंबर शोधू लागले.

आपण कितपत अभ्यास केला होता, यावरून मी थर्ड क्लासची यादी शोधू लागले. त्यात नंबर दिसला नाही. मला जरा बरं वाटलं. मी सेकंड क्लासच्या यादीत नंबर शोधू लागले. तिथंही नंबर नाही. मग मी जरा आनंदानंच सरसर फर्स्ट क्लासमधले नंबर शोधले. त्यातही नाही! आनंदानं माझं ऊर भरून आलं आणि मी डिस्टिंक्शनची यादी बघितली आणि आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या यादीतही माझा नंबर नव्हता.

आता मात्र मी पुरती घाबरले. आपला पेपर परीक्षकांना मिळालाच नसेल का? काही गफलत झाली असेल का? गहाळ झाला असेल का असे प्रश्न पडायला लागले.. माझं लक्ष अगदी सहज खाली असलेल्या एका यादीवर गेलं... आणि तिथं पहिलाच नंबर माझा होता! मी आनंदात यादीचं हेडिंग बघितलं आणि पायाखालची जमीन सरकणं काय असतं, हे मी अनुभवलं... कारण मी ‘फेल’ झाले होते!

ज्या मुलीनं पहिले तीन नंबर कधी सोडले नाहीत ती ‘फेल’! हा विचार करूनच मला गरगरायला लागलं. आता पुढच्या वर्षीच्या बॅचबरोबर परत अकरावी द्यावी लागणार, सगळे मला ‘फेल्युअर’ म्हणून चिडवणार, भावंडं मुद्दाम ‘किती टक्के पडले?’ असं विचारणार, आणि आई-बाबा तर... ते काय करतील याचा विचार करूनच थरकाप उडाला. वर्षभर किती गाण्याचे कार्यक्रम केले? बॅाल बॅडमिंटनच्या मॅचेस खेळले, किती सिनेमे बघितले हे सगळं समोर फिरायला लागलं. मार्कशीट दिली जात होती, तिथं मी जवळजवळ तोंड लपवतच गेले... मार्कशीट घेतली आणि थेट कॅालेजमध्ये ज्यांनी माझं ‘पालकत्व’ स्वीकारलं होतं, त्या माझ्या आरेकर सरांकडे गेले.. रडतच होते. मार्कशीट पहिल्यांदा उघडली. मला ६४ टक्के मिळाले होते; पण गणितात फक्त ३ मार्क मिळाले होते! हो!

माझी ‘कल्चरल कोटा’मध्ये ॲडमिशन झाली होती. म्हणजे कॉलेजसाठी गायन-वादन करणाऱ्या मुलांमध्ये निवडलेलं होतं कारण माझ्याकडे शास्त्रीय गायन-वादनाची सर्टिफिकिटं होती. मी सरांना गळ घातली, की ‘अशा मुलांना मार्क वाढवून दिले जाऊ शकतात ना.. मग माझे पण वाढवून घ्या आणि मला पुढे ढकला’! सर म्हणाले, ‘‘गणिताच्या प्रोफेसरांशी बोलून बघतो!’’ ते तासाभराने परत आले आणि म्हणाले, ‘‘वर्षभराच्या ४ परीक्षांच्या गुणांची टोटल १०४ असायला हवी.. तर मार्क वाढवता येतात.’’ मी लगेच विचारलं, ‘‘माझी किती होतेय टोटल?’’ त्यावर सर म्हणाले, ‘‘चार परीक्षा मिळून ‘३’ मार्क टोटल आहे तुझी जुय्या!!’’ मग मला अजूनच रडू फुटलं. सगळी स्वप्नं, इच्छा, आकांक्षा अगदी क्षणार्धात ठेचलं गेलं! इतक्यात आरेकर सर म्हणाले, ‘‘चला इट्स टाइम टू सेलिब्रेट.’’ दोन सेकंद मला प्रश्न पडला, की नक्की पट्टीचा मार खाऊन की बांबूच्या छडीचा मार खाऊन, की अजून कसला मार खाऊन होणारं हे ‘सेलिब्रेशन’? मी काहीच बोलले नाही... काही वेळात सर म्हणाले, ‘‘चला निघूया. ‘वेलकम टु द फेल्युयर्स लीग’’’

हे ऐकून तेव्हा मला पुढे नक्की काय घडणारे याचा अंदाजच येत नव्हता. माझ्या कॉलेजला असलेले आणि कर्जतलाच राहणारे माझे इतर मित्र-मैत्रिणी आले आणि आम्ही स्टेशनला गेलो. वाटेत सरांनी माझ्यासाठी मॅंगो ड्रिंक, चिप्स, चॉकलेटं घेतली आणि माझ्यासाठी चक्क फर्स्टक्लासचं तिकीट काढलं. आम्ही कर्जतकडे निघालो. मी न राहवून विचारलं, ‘‘सर, हे नक्की कसलं सेलिब्रेशन आहे?’’ सर हसत म्हणाले, ‘‘तुझ्या पहिल्या फेल्युअरचं.’’ तेही सेलिब्रेट करायला हवं ना! म्हणजे ते कायम लक्षात राहील! आत्ता आपल्याबरोबर असलेले तुझे सगळे मित्र-मैत्रिणी किमान एकदा फेल झालेत. मी स्वतः फेल झालोय. मग ते लक्षात नको को राहायला?’’

सर म्हणाले, ‘‘हा दिवस कायम लक्षात ठेव आणि याची पुनरावृती कधी होणार नाही याची काळजी घे. तुझं वर्ष वाया जाणार नाही, तू बाहेरून बस परीक्षेला. ज्या गणितामुळे फेल झालीस, तो विषय बदलून सेक्रेटोरीयल प्रॅक्टिस घे. बाकी सगळं मी बघतो.’’ मी खरी ढसाढसा रडायला लागले. कर्जतला उतरल्यावर सर माझ्या घरी आले. माझ्या वडिलांचे ते बालमित्र. त्यामुळे बाबांना त्यांनी माझी बाजू घेऊन समजावलं. मी कशी वर्षभर मोठमोठ्या कार्यक्रमांना गायले म्हणून लेक्चरला गेले नाही इत्यादी गोष्टी आई-बाबांना समजावल्या.

पुढे मी बारावीची परीक्षा दिली. प्रथम श्रेणीत पास झाले. नंतर शेवटच्या वर्षाला बीएमएमला मुंबई विद्यापीठातून प्रथम आले. पुढे मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला, एमबीए मार्केटिंग केलं.. आणि आजही एका वेगळ्या विषयाचा अभ्यास सुरूच आहे. सांगायचं तात्पर्य हे, की हल्ली असे शिक्षक कुठे पाहायला मिळतात? इतक्या सोप्या पद्धतीनं त्यांनी मला आयुष्यभराची दिशा सेट करून दिली. कॉलेजला कित्येकदा आम्ही कॅंटीन बिलं सरांच्या नावावर टाकलीत. कितीदा सरांनी आमचे लाड पुरवलेत. पोटच्या पोरापेक्षा जास्त मदत त्यांनी आमची केलीये, वेळ आम्हाला दिलाय. आजही मी सगळ्या गोष्टी सरांशी शेअर करते.

वेळ पडलीच तर त्यांचा ‘अगं गाढवे’ अशा शब्दांनी सुरू होणारा ओरडा खाते! आजही त्यांच्याकडे हक्काने हट्ट करते. शूटिंग संपवून घरी जाताना आजही त्यांच्याशी बोलते. आपल्या विद्यार्थ्यांवर इतकं जीवापाड प्रेम करणारा शिक्षक मी तरी कधी बघितला नाही. सर हल्ली पटकन बोलून जातात, ‘‘अरे, आतातरी मोठे व्हा रे गाढवांनो. तुमचा मास्तर आता थकलाय.’’ आणि चटकन मनात चर्र होतं! कारण आई-बाबा आणि असे शिक्षक कधी म्हातारे होतात का? कधीच नाही! सरांबरोबरचा एकेक प्रसंग आजही आठवतो आणि वाटतं... की देव सगळीकडे नसू शकतो, म्हणूनच आयुष्यभर जपून ठेवावी अशी माणसं तो आपल्याला देतो का?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.