डाळिंब खरेदी करताना गोंधळात पडता? या’ ४ सोप्या टिप्स वापरा आणि योग्य डाळिंब सहज ओळखा
GH News April 17, 2025 06:16 PM

डाळिंब हे फळ जितकं चवदार, तितकंच आरोग्यासाठीही फायदेशीर. हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी, त्वचेसाठी, पचनासाठी आणि इम्युनिटीसाठी डाळिंब उपयुक्त मानलं जातं. पण रोजच्या घाईगडबडीत बाजारातून डाळिंब घेताना अनेकदा गोड आणि रसाळ डाळिंब मिळेलच याची खात्री नसते. दिसायला भारी, पण कापल्यावर आंबट किंवा फिके दाणे निघतात आणि मूडही खराब होतो.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा चार सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या आधारे तुम्ही डाळिंब न कापता, बाजारात उभं राहूनच गोड आहे की नाही हे सहज ओळखू शकता.

१. डाळिंबाचा रंग गोंधळात टाकू शकतो!

आपल्यापैकी अनेकांना वाटतं की लाल डाळिंब म्हणजे गोड. पण हे नेहमी खरं नसतं. खूपच चमकदार आणि चकचकीत लाल रंग असलेली डाळिंबं कधी कधी कच्ची किंवा आंबट असतात. गोड डाळिंब ओळखायचं असेल, तर थोडीशी तपकिरी झाक असलेलं, मॅट फिनिश असलेलं डाळिंब निवडा. अशी डाळिंबं अधिक गोड असण्याची शक्यता असते.

२. वजनावरून कळेल डाळिंब रसाळ आहे का!

एकाच आकाराची दोन डाळिंबं हातात घेऊन पहा. जी डाळिंब हातात घेतल्यावर अधिक जड वाटते, ती रसाळ आणि गोड असण्याची शक्यता जास्त असते. उलट हलकी डाळिंबं आतून कोरडी किंवा कमी रसाची असू शकतात.

३. गुळगुळीत, पातळ साल असेल तर Bingo!

डाळिंबाची साल गुळगुळीत, पातळ आणि किंचित सुरकुतलेली असेल तर ते डाळिंब गोड असण्याची शक्यता अधिक असते. याउलट, ज्याची साल जाड, कडक आणि खरड असते, अशा डाळिंबात दाणे कोरडे किंवा आंबट निघण्याची शक्यता जास्त असते.

४. डाळिंबावर टकटक करा आणि आवाज ऐका!

डाळिंब हलकं हातात धरून त्यावर टकटक करून आवाज ऐका. जर आवाज जडसर, घन वाटला, तर डाळिंब भरलेलं आणि रसाळ आहे. पण जर आवाज पोकळ वाटला, तर डाळिंब कच्चं, कोरडं किंवा कमी गोड असू शकतं.

या टिप्स लक्षात घेतल्यास बाजारात डाळिंब खरेदी करताना तुमचं फळ नक्कीच गोड आणि रसाळ असेल. डाळिंब आता कापल्यावर गोड निघेल की नाही, याचा टेन्शन घेण्याची गरजच नाही!

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.