अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) च्या संचालक मंडळाने सिंगापूरमधील ॲबॉट पॉइंट पोर्ट होल्डिंग्स (APPH) च्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. APPH च्या मालकीच्या संस्था नॉर्थ क्वीन्सलँड एक्सपोर्ट टर्मिनल (NQXT) ची मालकी आणि संचालन करतात. हे एक समर्पित निर्यात टर्मिनल आहे, ज्याची सध्याची क्षमता ५० दशलक्ष टन प्रतिवर्ष (MTPA) इतकी आहे. हे टर्मिनल ॲबॉट पॉइंट बंदरावर बोवेनच्या उत्तरेस सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आणि ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेले आहे.
हा व्यवहार रोख रकमेमध्ये होणार नाही. APSEZ, APPH मधील १०० टक्के स्वारस्य संपादनाच्या बदल्यात CRPSHPL ला १४.३८ कोटी इक्विटी शेअर्सचे वाटप करेल. हे NQXT च्या A$ ३,९७५ दशलक्ष मूल्यांकनावर आधारित आहे. या व्यवहाराचा भाग म्हणून APSEZ APPH च्या ताळेबंदवरील इतर गैर-मुख्य मालमत्ता आणि दायित्वे देखील स्वीकारेल. जी APSEZ अधिग्रहणाच्या काही महिन्यांत वसूल करेल. या व्यवहारानंतर APSEZ चा लीव्हरेज समान पातळीवर राहील. यामुळे प्रवर्तक गटाच्या हिस्सामध्ये २.१३ टक्क्यांची वाढ होईल.
NQXT चे एंटरप्राइज मूल्य ३,९७५ दशलक्ष डॉलर इतके आहे. NQXT हे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये असलेले एक महत्त्वाचे निर्यात केंद्र आहे. त्याची क्षमता १२० MTPA पर्यंत वाढवण्याची योजना आहे. ज्यामुळे भविष्यातील हरित हायड्रोजन निर्यातीसह संसाधनांच्या वाढत्या जागतिक मागणीला पुरवठा केला जाऊ शकेल.
APSEZ चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी गुप्ता म्हणाले, “NQXT चे अधिग्रहण ही आमच्या आंतरराष्ट्रीय धोरणातील एक महत्त्वपूर्ण पायरी आहे, ज्यामुळे नवीन निर्यात बाजारपेठा उघडल्या जातील. तसेच महत्त्वपूर्ण वापरकर्त्यांशी दीर्घकालीन करार सुरक्षित होतील. पूर्व-पश्चिम व्यापार मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेले NQXT, वाढलेली क्षमता, मध्यम मुदतीत आगामी करार नूतनीकरण आणि दीर्घ मुदतीत हरित हायड्रोजन निर्यातीची क्षमता यामुळे एक उच्च-कार्यक्षम मालमत्ता म्हणून मजबूत वाढीसाठी तयार आहे. आमचे लक्ष्य ४ वर्षांत EBITDA ४०० दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्याचे आहे. NQXT चे आमच्या ‘ग्रोथ विथ गुडनेस’ उपक्रमात स्वागत करताना मला आनंद होत आहे. कारण ते पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन पद्धतींमध्ये उच्च मानकांबद्दलच्या आमच्या बांधिलकीचे उदाहरण आहे.”