मुंबई इंडियन्सने 17 एप्रिलला सनरायजर्स हैदराबादवर वानखेडे स्टेडियममध्ये 4 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईने यासह आयपीएलच्या 18 व्या मोसमातील तिसरा आणि वानखेडे स्टेडियममधील दुसरा विजय साकारला. हैदराबादने मुंबईला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 11 बॉलआधी 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने 18.1 ओव्हरमध्ये 166 धावा केल्या. मात्र या विजयानंतरही मुंबईला अपेक्षित फायदा झाला नाही. मुंबईला मोठा फायदा करुन घेण्याची संधी होती. मात्र मुंबईने शेवटपर्यंत सामना खेचला. त्यामुळे मुंबईची पॉइंट्स टेबलमधील स्थिती ‘जैसे थे’च आहे.
मुंबईने 163 धावांचा पाठलाग करताना हार्दिक पंड्या याच्या रुपात पाचवी विकेट गमावली. मुंबईला विजयासाठी अवघी 1 धाव पाहिजे असताना हार्दिक 18 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर आऊट झाला. त्यानंतर मुंबईला त्या विजयी धावेसाठी 5 चेंडूंची वाट पाहावी लागली. हार्दिकने घाई न करता ती 1 धाव केली असती तर मुंबईचा 16 चेंडूंआधी विजय झाला असता. मात्र तसं होऊ शकलं नाही. हार्दिकनंतर 18 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर नमन धीर एलबीडबल्यू आऊट झाला. त्यानंतर ओव्हरमधील सहाव्या बॉलवर मैदानात आलेल्या मिचेल सँटनर यालाही धाव काढता आली नाही. त्यामुळे तिलक वर्मा स्ट्राईकवर आला. तिलकेन 19 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर चौकार ठोकत विजय मिळवून दिला.
हार्दिकने केलेली घाई आणि त्यानंतर फक्त 1 धाव करण्यात अपयशी ठरलेले मुंबईचे फलंदाज यामुळे पलटणला तोटा सहन करावा लागला. मुंबईच्या नेट रनरेटमध्ये सुधारणा झाली. मात्र मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये विजयानंतरही सातव्या स्थानीच राहिली. मुंबईच्या विजयानंतर नेट रनरेटमध्ये 135 पॉइंट्सने वाढ झाली. मात्र मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी पोहचण्यात अपयशी ठरली. मुंबईचा नेट रनरेट हा या सामन्याआधी +0.104 असा होता. हा नेट रनरेट विजयांनतर +0.239 असा झाला आहे.
मुंबई विजयानंतरही सातव्या स्थानीच
तर दुसऱ्या बाजूला हैदराबादचा हा या मोसमातील 7 सामन्यांमधील पाचवा पराभवल ठरला. हैदाराबाजने विजयी सुरुवातीनंतर सलग 4 सामने गमावले. मात्र पंजाबला पराभूत करत हैदराबादने कमबॅक केलं. मात्र हैदराबाद मुंबईला पराभूत करुन सलग दुसरा विजय मिळवण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आता हैदराबादला या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे.