मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात सनराजयर्स हैदराबादला पराभूत केलं. मुंबईने यासह एकूण तिसरा विजय मिळवला. मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्याचं आयोजन हे वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मुंबईने घरच्या मैदानातील सामना 4 विकेट्सने जिंकला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. मुंबईने प्रत्युत्तरात 18.1 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. विल जॅक्स हा मुंबईच्या विजयाचा नायक ठरला. विलने बॉलिंग आणि बॅटिंगने योगदान दिलं. विलने 36 धावांची खेळी केली. तर त्याआधी 2 विकेट्सही घेतल्या. मुंबईने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली.
तर दुसऱ्या बाजूला पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादचा हा एकूण पाचवा पराभव ठरला. हैदराबादच्या पराभवानंतर पॅटने प्रतिक्रिया दिली. “ही खेळपट्टी सोपी नव्हती. आम्ही आणखी काही धावा करण्यात अपयशी ठरलो. आम्हाला आणखी काही धावा करायच्या होत्या.फार अवघड विकेट होती. जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा सोपी वेगवान खेळपट्टी मिळेल, अशी आशा असते. मात्र तसं होऊ शकलं नाही. त्यांनी (मुंबईने) खरंच चांगली बॉलिंग केली आम्हाला बांधून ठेवलं”, असं म्हणत पॅटने मुंबईच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. कर्णधार म्हणून पंड्याने हुशारीने गोलंदाजांचा वापर केला आणि हैदराबादला रोखण्यात यश मिळवलं.
“मला वाटलं की आम्ही बेस कव्हर केला आहे. 160 धावा कमी असल्यासारखं वाटतं. आम्ही बॉलिंगने दमदार कामगिरी केली. आम्हाला विकेट पाहिजे, असं वाटलं. आमच्याकडे डेथ बॉलिंगसाठी खूप काही होतं. इमपॅक्ट प्लेअर 1-2 ओव्हर बॉलिंग करु शकेल, हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे आम्ही राहुलला निवडलं”, असं पॅटने सांगितलं.
अंतिम फेरीसाठी घराबाहेरील प्रत्येक सामन्यात चांगलं खेळावं लागेल. दुर्देवाने आतापर्यंत आम्हाला सूर गवसला नाहीय. आमच्याकडे आता काही दिवसांचा अवधी आहे. आम्ही प्रत्येक सामन्याबाबत चचा करतो. मुलांनी पावरप्लेमध्ये चांगला खेळ केला. तसेच बेछूटपणे फटकेबाजी केली नाही. आमचा पुढील सामना घरच्या मैदानात आहे. आम्हाला घरच्या मैदानातील चांगली माहिती आहे”, असं म्हणत पॅटने विश्वास व्यक्त केला.